लघू उद्योगास संघटित होण्याची गरज : गोयल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:50 AM2017-08-14T00:50:54+5:302017-08-14T01:52:53+5:30
राज्य आणि केंद्र सरकारला लघू उद्योजकांची काळजी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य आणि केंद्र सरकारला लघू उद्योजकांची काळजी आहे. या क्षेत्राच्या समस्या सोडविण्याला सरकारचे प्राधान्य राहील, अशी ग्वाही देत, केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी भारतातील लघू उद्योगाला आता संघटित होण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले.
लघू उद्योग भारतीतर्फे छोटे आणि लघू उद्योजकांसाठी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय संमेलनात ते बोलत होते. मुंबईमध्ये आयोजित केलेल्या या एकदिवसीय संमेलनासाठी लघू उद्योग भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष ओमप्रकाश मित्तल, राष्ट्रीय उपाध्यक्ष भूषण वैद्य, महाराष्ट्र प्रदेश महामंत्री रवींद्र सोनावणे आणि लघू उद्योग भारतीचे कोकण प्रांत महासचिव भूषण मर्दे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
गोयल म्हणाले की, जीएसटी परिषदेत होणारे निर्णय सर्व सहमतीने होत आहेत. यापुढेही जीएसटीत काही बदल करण्यासाठी आवश्यकता वाटल्यास, जीएसटी परिषद तसे बदल निश्चितच करतील. जीएसटीमुळे खरेदी-विक्रीची सगळी माहिती आपोआप पटलावर येणार असल्याने चौकशीचा समेसिरा वाचेल. कारण कोणालाही भ्रष्टाचारच करता येणार नाही. प्रामाणिक उद्योजकांना चिंता करावी लागणार नाही. जीएसटी म्हणजे, शून्य रिटर्न आणि एकच स्टेटमेंट इतकी सुलभ व्यवस्था आहे.