समलैंगिकांच्या हक्कांचे रक्षण गरजेचे - डॉ. हर्षवर्धन
By admin | Published: July 18, 2014 09:56 AM2014-07-18T09:56:48+5:302014-07-18T09:56:48+5:30
समलैंगिक हे अन्य नागरिकांप्रमाणे असल्याने त्यांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करणे गरजेचे आहे असे विधान केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केले आहे.
Next
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १८- समलैंगिक व्यक्ती हे अन्य नागरिकांप्रमाणे असल्याने त्यांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करणे गरजेचे आहे असे विधान केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केले आहे. समलैंगिकतेला विरोध दर्शवणा-या भाजपच्या केंद्रीय आरोग्य मंत्र्यांने असे सूचक विधान केल्याने भाजपने या संवेदनशील विषयावरील भूमिका बदलल्याचे दिसते.
गुरुवारी एका कार्यक्रमात पत्रकारांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना समलैंगिकांचे हक्क आणि या संबंधांना गुन्हेगार ठरवणारा कायदा याविषयी प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना डॉ. हर्षवर्धन म्हणाले, प्रत्येक व्यक्तीला मानवी हक्क दिलेले असतात. सरकारने त्याच्या या हक्कांचे रक्षण करणे गरजेचे आहे.
सुप्रीम कोर्टाने समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणा-या भारतीय दंड विधानातील कलम ३७७ मध्ये बदल करण्यास नकार दिला होता. त्यावेळी विरोधी बाकावर असलेल्या भारतीय जनता पक्षाने या निर्णयाचे समर्थन केले होते. या कायद्यात बदल करण्याची मागणी समलैंगिकांसाठी काम करणा-या समाजसेवी संघटना करत असल्या तरी त्यावेळचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मात्र समलैंगिक संबंधांना अनैसर्गिक ठरवले होते.
भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आजपर्यंत समलैंगिकतेला कडाडून विरोध केला आहे. यापासून फारकत घेत डॉ. हर्षवर्धन यांनी समलैंगिक संबंधांना पाठिंबा दर्शवणारे विधान केले. भाजपच्या भूमिकेशी तुम्ही फारकत घेतली आहे का या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांनी टाळले आहे.