शेतक-यांच्या 'मन की बात' समजून घेण्याची गरज - राहुल गांधी
By Admin | Published: April 29, 2015 09:51 AM2015-04-29T09:51:18+5:302015-04-29T09:58:46+5:30
शेतक-यांना फक्त पैसे देऊन उपयोग नाही,त्यांच्या मन की बात समजून घेण्याचीही आवश्यकता आहे असा चिमटा काढत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
ऑनलाइन लोकमत
लुधियाना, दि. २९ - शेतक-यांना फक्त पैसे देऊन उपयोग नाही, पैसे देणे ही चांगलीच बाब आहे, पण त्यांच्या मन की बात समजून घेण्याचीही आवश्यकता आहे असा चिमटा काढत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. जिथे जिथे शेतकरी व कामगार वर्गावर अन्याय होत असेल व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नसेल तिथे जाऊन त्यांच्यासाठी आवाज उठवू असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या पंजाब दौ-यावर असून बुधवारी महाराष्ट्रात रवाना होण्यापूर्वी राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शेतक-यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पंजाबला आलो आहे असे त्यांनी सांगितले. शेतक-यांना पैसे देऊन प्रश्न सुटत नाही. त्यांचे दुःख, समस्या ऐकून घेण्याची गरज आहे व केंद्र सरकार यात कमी पडत आहे अशी टीकाही त्यांनी केली. पंजाबमधील शेतकरी हे देशाला सर्वाधिक धान्य पुरवतात. शेतकरी व कामगार वर्ग 'मेक इन इंडिया' घडवत नाही का, मेक इन इंडिया फक्त दुसरीच मंडळी घडवू शकतात का असा खोचक सवालही त्यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.