लॉकडाउन : NEET परीक्षा पुढे ढकलली, मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत स्थगिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 10:13 PM2020-03-27T22:13:02+5:302020-03-27T22:26:23+5:30
केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करत ही माहिती दिली. मेच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत ही परीक्षा स्थगित करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मानव संसाधन विकास मंत्रालयाने नीट 2020 (यूजी)ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय सर्व स्पर्धापरिक्षाही स्थगित करण्यात आल्या आहेत. नीट (यूजी) 2020 परीक्षेपूर्वी जेईई (मुख्य) परीक्षाही स्थिगित करण्यात आली आहे. मात्र, नीट (यूजी) 2020 संदर्भात स्पष्टता नव्हती. केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करत ही माहिती दिली. मेच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत ही परीक्षा स्थगित करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Since Parents and Students have to travel to different examination centres, to avoid any inconvenience to them, I have directed National Testing Agency @DG_NTA to postpone NEET (UG) 2020 and JEE(Main) till last week of May. pic.twitter.com/loji50ZQq3
— Dr Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) March 27, 2020
शुक्रवारीच येणार होते अॅडमिट कार्ड -
नीट 2020 साठीचे अॅडमिट कार्ड शुक्रवारीच जारी करण्यात येणार होते. मात्र ते करण्यात आले नाही. एनटीएच्या अधिकाऱ्यांनी म्हटले होते, की 14 एप्रिलला रिव्ह्यू केला जाईल आणि यानंर अॅडमिट कार्ड जारी करण्याची तारीख जाहीर केली जाईल. 3 मेला नीट परीक्षेचे आयोजन करण्यात येणार होते. मात्र आता ही परिक्षा स्थगित करण्यात आली असून पुढील तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करून सांगितले, की त्यांनी नॅशनल टेस्टिंग एजंसीला परीक्षा स्थगित करण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांनी घरीच थांबावे आणि या वेळेचा परीक्षेच्या तयारीसाठी वापर करावा, असेही निशंक यांनी म्हटले आहे.
या शिवाय मंत्रालयाने सीबीएसई, एनआयओएस आणि इतर शैक्षणिक संस्थांनाही परीक्षा स्थगित करण्याचे निर्देश दिले आहेत. आता एचआरडी मंत्रालयाने सीबीएसई, एनआयओएस आणि इतर शैक्षणिक संस्थांना आणि एनसीईआरटीला परीक्षांचा नवीन शेड्यूलवर कामकरण्याचे निर्देश दिले आहेत.