जेईई-नीट परीक्षा स्थगितीसाठी सपाच्या कार्यकर्त्यांचा राजभवनला घेराव, पोलिसांकडून लाठीमार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 07:10 PM2020-08-27T19:10:24+5:302020-08-27T19:37:48+5:30
उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या निर्णयाला विरोध करत राजभवनाला घेराव घातला.
लखनऊ : देशात कोरोना संकट काळात केंद्र सरकारने जेईई (मुख्य) आणि नीट परीक्षा देखील घेण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षा घेण्याच्या निर्णयावरुन केंद्र सरकारवर टीका असून अनेक राजकीय पक्षांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे.
याच पार्श्वभूमीवर गुरुवारी उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या निर्णयाला विरोध करत राजभवनाला घेराव घातला. यावेळी कार्यकर्त्यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केले आणि सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडविला. त्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना हटविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली आहे.
पोलीस आणि कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलन करणाऱ्या समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. यामध्ये काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत.
दरम्यान, सप्टेंबरमध्ये होणाऱ्या जेईई (मुख्य) आणि नीट परीक्षांमध्ये सुमारे 28 लाख विद्यार्थी भाग घेणार आहेत. कोरोना साथीच्या आजारामुळे अनेक पक्षांकडून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, परीक्षा आयोजित करणाऱ्या एनटीएने म्हटले आहे की, दोन्ही परीक्षा वेळेवर होतील. त्यासाठी एनटीएने प्रवेश पत्रही जारी केले आहे.
काँग्रेसचे उद्या महाराष्ट्रात आंदोलन
मुंबई : कोरोनाचे संकट अजूनही गंभीर असताना केंद्रातील मोदी सरकार जेईई व नीट परीक्षा घेण्यावर ठाम आहे. लाखो विद्यार्थी व पालकांना त्यांच्या आरोग्याची व सुरक्षेची चिंता सतावत असताना मोदी सरकार मात्र अशा गंभीर परिस्थितीतही परीक्षा घेण्याचा हट्ट सोडायला तयार नाही. मोदी सरकारच्या या आडमुठ्या, हटवादी भुमिकेला विरोध करत परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, या मागणीसाठी उद्या (शुक्रवारी) राज्यव्यापी आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
जगभरातील १५० हून अधिक शिक्षणतज्ज्ञांचं नरेंद्र मोदींना पत्र
भारतासह जगभरातील विद्यापीठांच्या १५० हून अधिक शिक्षणतज्ज्ञांनी या परीक्षांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. जर वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षा जेईई (मेन) आणि नीट या परीक्षांना अजून विलंब झाला तर विद्यार्थ्यांच्या भविष्यावर याचा विपरीत परिणाम होईल, असे शिक्षणतज्ज्ञांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.याचबरोबर, काही लोक आपल्या राजकीय अजेंड्याला पुढे नेण्यासाठी विद्यार्थ्य़ांच्या भविष्यासोबत खेळत आहेत. तरूण आणि विद्यार्थी वर्ग हे देशाचे भविष्य आहे. मात्र, त्यांच्या पुढील वाटचालीवर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. प्रवेशाबाबत आणि अन्य प्रक्रियांबाबत अनेक शंका असून त्या लवकरात लवकर सोडवल्या गेल्या पाहिजेत, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
आणखी बातम्या...
उद्धव ठाकरेंनी बिगर भाजपाशासित राज्यांचे नेतृत्व करावे- संजय राऊत
घर घेणाऱ्यांसाठी ठाकरे सरकारचा मोठा दिलासा, 31 डिसेंबरपर्यंत स्टॅम्प ड्युटीत मोठी कपात
Accenture पाच टक्के कर्मचारी कपात करणार, भारतीय स्टाफवरही होणार परिणाम
"मोदीजी, तुमच्याप्रमाणे विद्यार्थी 8000 कोटींच्या विमानातून परीक्षा द्यायला जात नाहीत"
'सुशांत सिंह राजपूतवर विषप्रयोग?', भाजपा नेत्याचा खळबळजनक दावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात शक्तिशाली नेते, अभिनेत्री कंगना राणौतकडून ट्विट
आरबीआयने डेबिट, क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले; 30 सप्टेंबरपासून लागू होणार
CoronaVirus News : रशिया सर्वात आधी 'या' देशाला देणार कोरोनावरील लस...