NEET परीक्षेत शोएब अन् आकांक्षाला सेम गुण, मग आकांक्षाचाच दुसरा नंबर का?
By महेश गलांडे | Published: October 20, 2020 08:42 AM2020-10-20T08:42:42+5:302020-10-20T08:44:59+5:30
देशभरात १३ सप्टेंबर व १४ ऑक्टोबर रोजी NEET ची परीक्षा घेण्यात आली होती. देशभरातून सुमारे १५ लाख ९७ हजार ४३५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल 16 ऑक्टोबर रोजी जाहीर झाला
मुंबई - वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर झाला. त्यात ओडिशाचा शोएब आफताब व दिल्लीच्या आकांक्षा सिंह यांनी ७२० गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक मिळविला. मात्र, देशात पहिला क्रमांक पटकावला म्हणून शोएब आफताब याची नोंद झाली तर शोएब एवढेच गुण मिळवून आकांक्षाला दुसरा क्रमांक मिळाला आहे. त्यामुळे, ही प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची गुणवत्ता कशी ठरवली जाते, यावरुन सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
देशभरात १३ सप्टेंबर व १४ ऑक्टोबर रोजी NEET ची परीक्षा घेण्यात आली होती. देशभरातून सुमारे १५ लाख ९७ हजार ४३५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल 16 ऑक्टोबर रोजी जाहीर झाला, पण दिवसभर एनटीएचे सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड होऊन निकाल हाती यायला उशीर झाला. या निकालात ओडिशाच्या शोएब आफताबने ७२० गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक मिळवला, पण तेवढेच गुण मिळूनही आकांक्षाला दुसरा क्रमांक मिळाला आहे.
उत्तर प्रदेशातील आकांक्षा सिंहच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे, अभिनंदन करण्यासाठी लोकांची गर्दी असून आई-वडिलांनाही मोठा आनंद झालाय. आकांक्षालाही अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले असून ७०० पेक्षा जास्त गुण मिळतील, असा तिचा अंदाज होता. मात्र, प्रथम किंवा द्वितीय स्थान मिळेल, अशी आशा नव्हती, असे आकांक्षाने म्हटले. आकांक्षा आणि शोएब या दोघांनाही नीट परीक्षेत सारखेच गुण मिळाले आहेत. मग, आकांक्षाच द्वितीय क्रमांक आणि शोएबचा प्रथम क्रमांक कसा ठरला असा प्रश्न सर्वांनाच आहे. त्यामुळेच, सोशल मीडियावरुन आकांक्षावर अन्याय होत असल्याची चर्चा सुरूय. विशेष म्हणजे आकांक्षाचे फेक अकाऊंट तयार करुन त्यातूनही हाच प्रश्न विचारला आहे. मात्र, नॅशनल टेस्टींग एजन्सी, टाई-ब्रेकींगनुसार कमी वयाच्या विद्यार्थ्यास द्वितीय क्रमांक दिला जातो, त्यामुळे आकांक्षाचा पहिला नंबर हुकला. कारण, शोएब हा आकांक्षापेक्षा वयाने मोठा आहे.
आकांक्षाला न्यूरो सर्जन व्हायचे असून त्याच क्षेत्रात करिअर करायचे आहे. त्यामुळे, आकांक्षाने प्रथम किंवा द्वितीय क्रमांकाबद्दल आपल्याला काहीच वाटत नाही, कारण एम्समध्ये आपल्याला प्रवेश मिळेल, याचाच आनंद असल्याचे आकांक्षाने म्हटले. तसेच, तिच्या आई-वडिलांचीही तीच भूमिका असून नंबर गेमपेक्षा इच्छित ठिकाणी शिक्षण मिळतेय, हेच महत्त्वाचे असल्याचं आकांक्षाच्या वडिलांनी म्हटलंय.
महाराष्ट्रातील 4 जण टॉप 50 मध्ये
महाराष्ट्रातील आशिष अविनाश झान्ट्ये याने ७१० गुण मिळवून राज्यात अव्वल स्थान मिळविले. तर तेजोमय नरेंद्र वैद्य, पार्थ संजय कदम व अभय अशोक चिल्लरगे या तिघांनी ७०५ गुण मिळवून राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला. देशातील सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या ५० विद्यार्थ्यांमध्ये उपरोक्त ४ जणांचा समावेश आहे.