जिद्दीला सलाम! 64 वर्षी क्रॅक केली NEET; बँकेतून निवृत्त झाल्यावर सुरू केलं नवीन करिअर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 07:53 PM2024-04-18T19:53:41+5:302024-04-18T20:00:55+5:30
64 वर्षांच्या जय किशोर प्रधान यांनी NEET UG क्रॅक करून एक आदर्श निर्माण केला आहे. ते बँकेतून निवृत्त झाले आहेत.
शिक्षण घेण्यासाठी वयाची अट नसते हे एका व्यक्तीने सिद्ध केलं आहे. माणूस वयाच्या कोणत्याही वर्षी यशस्वी होऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिलं आहे. 64 वर्षांच्या जय किशोर प्रधान यांनी NEET UG क्रॅक करून एक आदर्श निर्माण केला आहे. ते बँकेतून निवृत्त झाले आहेत.
जय किशोर प्रधान हे ओडिशातील बरगढ जिल्ह्यातील अट्टाबिरा येथील रहिवासी आहेत. ते आधी बँकेत कर्मचारी होते. बँकेतून निवृत्ती घेतल्यानंतर, त्यांना दुसरं करिअर सुरू करायचं होतं. त्यांनी यासाठी मेडिकल फिल्ड निवडली. त्यांनी आय.एससी (इंटरमीडिएट इन सायन्स) पूर्ण केल्यानंतर नीटची परीक्षा दिली. पण तेव्हा ते नीट क्रॅक करण्यात यशस्वी झाले नाहीत.
प्रधान यांनी फिजिक्समधून बीएससी पूर्ण केली. अट्टाबिता M.E. शाळेत शिक्षक म्हणून काम करू लागले. 1983 मध्ये इंडियन बँकेत रुजू झाले आणि नंतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रुजू झाले. पण याच दरम्यान त्यांनी NEET UG क्रॅक करण्याची तयारीही सुरू ठेवली. मेडिकल फिल्डमध्ये करिअर करण्याचे त्यांचं स्वप्न होतं आणि शेवटी त्यांनी NEET क्रॅक केली.
जय किशोर प्रधान यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1956 रोजी झाला. त्यांना दोन जुळ्या मुली आणि एक मुलगा आहे. 2016 मध्ये बँकेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी NEET ची तयारी सुरू केली. डॉक्टर होऊन देशाची आणि समाजाची सेवा करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. त्यांना लोकांची मोफत सेवा करायची होती. विशेषतः ते लोक जे अपंग आहेत. 2018 पर्यंत, NEET मध्ये सहभागी होण्यासाठी कमाल वयोमर्यादा 25 वर्षे होती, जी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली आहे. त्यामुळे प्रधान हे NEET च्या परीक्षेला बसू शकले.