नीट पेपर लीक प्रकरणी सीबीआयची कारवाई, 'मास्टरमाईंड'सह दोन विद्यार्थ्यांना अटक!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 08:34 PM2024-07-20T20:34:12+5:302024-07-20T20:34:29+5:30
NEET paper leak case: नीट-यूजी पेपर लीक प्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) सतत कारवाई करत आहे.
नवी दिल्ली : नीट-यूजी पेपर लीक प्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) सतत कारवाई करत आहे. या प्रकरणात सीबीआयने आणखी तीन जणांना अटक केली आहे. यामध्ये पेपर लीक टोळीचा मुख्य सुत्रधार शशिकांत पासवानचाही समावेश आहे. याशिवाय, या टोळीशी संबंधित दोन विद्यार्थ्यांनाही अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेले विद्यार्थी भरतपूर मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांपैकी एक प्रथम वर्षाचा तर दुसरा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. कुमार मंगलम आणि दीपेंद्र शर्मा अशी त्यांची नावे आहेत. तर यापूर्वी अटक करण्यात आलेल्या पंकज आणि राजूचा सहकारी शशिकांत पासवान यालाही अटक करण्यात आली. हे सर्व जण पेपर सोडवण्यासाठी ५ मे रोजी सकाळी हजारीबागेत उपस्थित होते.
यापूर्वी, १९ जुलै रोजी सीबीआयने नीट-यूजी पेपर लीक प्रकरणी झारखंडमधील रांची येथून एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीला ताब्यात घेतले होते. सुरभी कुमारी असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या २०२३ च्या बॅचची विद्यार्थिनी आहे. तसेच, ती रामगड जिल्ह्यातील रहिवासी आहे. या विद्यार्थिनीवर ५ मे रोजी हजारीबागेत पेपर सोडवण्यासाठी हजर राहिल्याचाही आरोप आहे.
दुसरीकडे, गुरुवारी (१८ जुलै) सीबीआयने पेपर लीक प्रकरणात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) - पाटणाच्या चार एमबीबीएस विद्यार्थ्यांसह पाच जणांना अटक केली होती. दरम्यान, परीक्षेतील गैरप्रकारांबाबत सीबीआय तपास करीत असून आतापर्यंत बिहार, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थानमध्ये एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत.