NEET पेपर लीक, महाराष्ट्रासह ३ राज्यात नेटवर्क; मास्टरमाईंड अटकेत, आतापर्यंत काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 10:10 AM2024-06-24T10:10:44+5:302024-06-24T10:11:40+5:30

NEET परीक्षेतील पेपर लीकमुळे देशभरात विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ माजला आहे. या प्रकरणी केंद्राने सीबीआयकडे तपास सोपवला असून यात ३० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. 

NEET Paper Leak, Network in 3 States including Maharashtra; Mastermind Arrested, What Happened So Far? | NEET पेपर लीक, महाराष्ट्रासह ३ राज्यात नेटवर्क; मास्टरमाईंड अटकेत, आतापर्यंत काय घडलं?

NEET पेपर लीक, महाराष्ट्रासह ३ राज्यात नेटवर्क; मास्टरमाईंड अटकेत, आतापर्यंत काय घडलं?

नवी दिल्ली - देशात सध्या पेपर लीक प्रकरण खूप गाजतंय. NEET आणि UGC NET सारख्या स्पर्धात्मक परीक्षेत गोंधळ उडाला आहे. पेपर लीकमुळे देशभरातील विद्यार्थी चिंतेत आहेत. पेपर लीक प्रकरणी आतापर्यंत ६ राज्यांमध्ये नेटवर्क सापडलं आहे. त्यात आता या प्रकरणी सीबीआयची एन्ट्री झाली आहे. यूपी आरओ आणि एआरओ यांना अटक करण्यात आली आहे. 

नीट पेपर प्रकरणी विरोधक आक्रमक

नीट पेपर लीक प्रकरणाने देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ आहे. या प्रकरणी विरोधकांनी सातत्याने केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. बिहार, झारखंड मध्ये विविध पोलीस यंत्रणा याबाबत धाडी टाकत आहे. आतापर्यंत या प्रकरणी विविध ठिकाणांवरून ३० हून अधिक जणांना अटक झाली आहे. राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरण (NTA) कडून ५ मे २०२४ रोजी नीटची परीक्षा ५७१ शहरातील ४ हजार ७५० परीक्षा केंद्रावर आयोजित केली होती. ज्यात देशातील अनेक शहरांचा समावेश होता. २३ लाखाहून अधिक विद्यार्थी या परीक्षेत सहभागी झाले होते.

६७ विद्यार्थी टॉप अनेकजण हैराण

४ जूनला जेव्हा नीट परीक्षेचा निकाल लागला तेव्हा ६७ विद्यार्थ्यांनी टॉप रँक मिळवलं. या ६७ उमेदवारांना एकसारखेच ९९.९९९७१२९ पर्संनटाईल दिले होते. आतापर्यंत इतक्या मोठ्या संख्येने इतके विद्यार्थी टॉप आले नव्हते. सर्वाधिक २०२१ मध्ये ३ विद्यार्थ्यांनी टॉप केले होते. हा निकाल पाहून अनेकांना धक्का बसला. अखेर एवढ्या मुलांना फुल मार्क्स कसे मिळाले असा प्रश्न उपस्थित झाला. या ६७ पैकी ८ विद्यार्थी एकाच परीक्षा केंद्रावरचे होते. 

४ राज्याशी कनेक्शन

बिहार - नीट पेपर लीक प्रकरणी पहिल्यांदा बिहारमध्ये प्रकरण उघडकीस आलं. यातील मुख्य आरोपी अमित आनंदसह १३ जणांना बिहार पोलिसांनी अटक केली. पेपर विकण्यासाठी ४०-४० लाख रुपयांचा व्यवहार झाला. यातील एक आरोपी प्रदीप कुमार जो तेजस्वी यादव यांचा खासगी सचिव आहे. ज्याच्यावर आरोपी विद्यार्थ्यांसाठी गेस्ट हाऊस बुक करण्याचा आरोप आहे.अमित आनंद हा नीट पेपर लीकमधील सूत्रधार आहे. याआधीही तो पेपरलीकमध्ये सहभागी होता. त्याने सिंकदर यादवेंद्रु याच्यासोबत पेपर डिल केली. शनिवारी केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाने नीट पेपर लीक प्रकरण सीबीआयकडे सोपवले. 

झारखंड - नीट पेपर लीक केवळ बिहारमध्ये नाही तर झारखंडमध्येही कनेक्शन आढळलं. झारखंडमधून या प्रकरणी ६ जणांना अटक केली. झारखंडच्या हजारीबागच्या ओएसिस स्कूलमधून पेपर लीक झालं. हजारीबागचं हे स्कूल पेपर लीक प्रकरणी कुख्यात आहे. यावर्षी १५ मार्चला बीपीएससी परीक्षेचा पेपर लीक झाला होता त्यातही ओएसिस स्कूलचं नाव पुढे आले होते. 

गुजरात - गुजरातच्या गोध्रा येथे जय जलाराम स्कूल हेदेखील परीक्षा केंद्र वादात अडकलं आहे. याठिकाणीही अनेक राज्यातील विद्यार्थी NEET परीक्षा द्यायला आले होते. येथील सुप्रीटेंडेट, डिप्टी सुप्रीटेंडेंट यांच्यावर विद्यार्थ्यांकडून परीक्षेत कॉपी करण्यासाठी १०-१० लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी एका कोचिंग सेंटर प्रमुखासह ६ लोकांना अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र - नीट पेपरचे नेटवर्क महाराष्ट्रातही आढळलं आहे. राज्यातील लातूर येथे २२ जूनला २ शिक्षकांना ताब्यात घेत चौकशी करण्यात आली. संजय जाधव, जलील उमरखाँ पठाण असं त्यांची नावे आहेत. या दोघांना तपासानंतर रविवारी नोटीस देत सोडण्यात आले. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यात राहणाऱ्या इरन्ना मष्णाजी कोनगलवार आणि दिल्लीच्या गंगाधर यांच्यासह ४ जणांविरोधात लातूर येथे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता महाराष्ट्र सरकारने या प्रकरणी एसआयटी गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 

Web Title: NEET Paper Leak, Network in 3 States including Maharashtra; Mastermind Arrested, What Happened So Far?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.