कोरोनाचा कहर कायम असल्यानं NEET-PG परीक्षा लांबणीवर; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 03:50 PM2021-05-03T15:50:38+5:302021-05-03T15:59:38+5:30
NEET PG 2021 Exam Postponed by 4 Months Amid Covid 19 Surge: पंतप्रधान मोदींनी बोलावलेल्या बैठकीत झाला महत्त्वपूर्ण निर्णय
नवी दिल्ली: देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यानं मोदी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा-पदव्युत्तर (NEET-PG Exam) चार महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. त्यात NEET-PG परिक्षेबद्दलचा निर्णय घेण्यात आला. याबद्दलची माहिती आज पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली. (NEET PG 2021 Exam Postponed by 4 Months Amid Covid 19 Surge)
Prime Minister Narendra Modi authorises keys decisions to boost availability of medical personnel to fight COVID-19. NEET-PG Exam to be postponed for at least 4 months: Prime Minister's Office
— ANI (@ANI) May 3, 2021
कोरोनाच्या वाढत्या संकटाचा सामना कसा करायचा याबद्दल विचारमंथन करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी काल महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली. 'NEET-PG किमान चार महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा ३१ ऑगस्ट २०२१ च्या आधी होणार नाही. परिक्षेच्या तारखेची माहिती १ महिनाभर आधी विद्यार्थ्यांना देण्यात येईल. यामुळे कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपल्याला अधिक डॉक्टर्स उपलब्ध होतील,' असं प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी परिक्षार्थींकडून करण्यात आली होती. वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी आणि प्रॅक्टिस करत असलेले डॉक्टर NEET PG परिक्षेला बसतात. ही परिक्षा उत्तीर्ण झालेल्यांना MD/MS/PG डिप्लोमा कोर्ससाठी प्रवेश घेता येतो. एनबीईकडून NEET PG घेतली जाते. याआधी १८ एप्रिलला ही परीक्षा घेतली जाणार होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय NBE नं घेतला.