NEET PG exam 2022: केंद्राचा मोठा निर्णय! NEET PG परीक्षेला स्थगिती, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 11:30 AM2022-02-04T11:30:44+5:302022-02-04T11:30:53+5:30
NEET PG exam 2022: 12 मार्च रोजी होणारी NEET PG परीक्षा रद्द करण्यात आली असून, सरकारने ही परीक्षा 6-8 आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे. नवी तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.
नवी दिल्ली: मागील अनेक दिवसांपासून देशात मोठा चर्चेचा विषय ठरलेल्या NEET PG परीक्षेबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून NEET PG 2022 ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने परीक्षा 6 ते 8 आठवडे पुढे ढकलली आहे. ही परीक्षा आधी 12 मार्च रोजी होणार होती, पण आता तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती
NEET PG परीक्षेबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. NEET परीक्षा तूर्तास पुढे ढकलण्यात यावी, अशी याचिका अनेक विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होणार होती. याचिकाकर्त्यांनी त्यांच्या याचिकेत मेडिकल इंटर्नशिपचा हवाला दिला होता. अनेक विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप पूर्ण केलेली नाही. ते म्हणाले की, दोन बॅचला एकाच वेळी सर्व जागा कशा देता येतील. त्यामुळे 12 मार्च रोजी परीक्षा घेणे योग्य नाही.
विद्यार्थ्यांची कोर्टात याचिका
परीक्षा पुढे ढकलण्याची अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांची मागणी होती. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, NEET PG समुपदेशनाच्या गेल्या वर्षीच्या म्हणजेच 2021 च्या तारखा या वर्षीच्या परीक्षेच्या तारखेसोबत येत आहेत. अशा परिस्थितीत आगामी परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात. विद्यार्थ्यांनी ही मागणी सोशल मीडियावर मांडली आणि आरोग्य मंत्रालयाकडे या प्रकरणी लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती सातत्याने केली. यासाठी विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल केली होती, त्यावर कोर्टानेही विचार करण्यास मान्यता दिली होती. विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त मानून आरोग्य मंत्रालयाने आता परीक्षा 6 ते 8 आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे.