NEET Exam Scam: NEET परीक्षेत मोठा घोटाळा; 20-20 लाखांना विकल्या जागा, CBI तपासात खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 07:27 PM2022-07-19T19:27:04+5:302022-07-19T19:27:43+5:30
NEET Exam Scam: NEET-UG 2022 परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. यात महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश आणि हरियाणाचा समावेश आहे.
NEET Exam Scam: नुकतीच वैद्यकीय प्रवेशासाठी लागणारी NEET-UG 2022 परीक्षा झाली. या परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. CBI सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील टॉप मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी 20-20 लाख रुपयांना जागा विकल्या गेल्या आहेत. बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये याचे रॅकेट पसरले आहे.
कोचिंग क्लासेसचा हात
मिळालेल्या माहतीनुसार, संजय दत्तच्या "मुन्नाभाई एमबीबीएस" चित्रपटात दाखवल्याप्रमाणे हा सगळा खेळ सुरू होता. पेपर सॉल्व्हरने विद्यार्थ्यांकडून मोठी रक्कम घेतली आणि त्याबदल्यात उत्तरपत्रिका लिहिल्या. NEET-UG 2022 परीक्षेत फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने सोमवारी 8 जणांना अटक केली. यामध्ये मास्टरमाईंडचाही समावेश आहे. पेपर सोडवण्यासाठी 20-20 लाख रुपयांना जागा विकल्या गेल्याची माहिती मिळत आहे. या रॅकेटमध्ये काही टॉप कोचिंग इन्स्टिट्यूटचे नावे पुढे आले आहे.
ओळखपत्रात फेरफार
फसवणूक टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी NEET साठी सुरक्षा तपासण्या कडक केल्या होत्या. परीक्षा हॉलमध्ये पर्स, हँडबॅग, बेल्ट, कॅप्स, दागिने, शूजवरही बंद ीहोती. उमेदवारांना कोणतीही स्टेशनरी नेण्याची परवानगीही नव्हती. पण या रॅकेटने पेपर सोडवणाऱ्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश मिळावा म्हणून मॉर्फ केलेल्या छायाचित्र्यांचा वापर केला आणि ओळखपत्रात फेरफार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे.