नीट परीक्षेत शून्य गुण, तरीही मिळाला मेडिकलला प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 06:00 AM2018-07-17T06:00:43+5:302018-07-17T06:01:01+5:30
देशातील शैक्षणिक क्षेत्राचा कसा खेळखंडोबा झाला आहे, याचे उदाहरण २०१७ मधील एमबीबीएसच्या प्रवेशावरून दिसून येते.
नवी दिल्ली : देशातील शैक्षणिक क्षेत्राचा कसा खेळखंडोबा झाला आहे, याचे उदाहरण २०१७ मधील एमबीबीएसच्या प्रवेशावरून दिसून येते. ज्या विद्यार्थ्यांना नीट परीक्षेत १ किंवा २ अथवा दोन्ही विषयात शून्य व सिंगल डिजिट गुण मिळालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना एमबीबीएससाठी प्रवेश मिळाल्याचे प्रकार समोर आले आहेत.
मेडिकलच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेत किमान ४०० विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीत सिंगल डिजिट गुण मिळाले आहेत, तर ११० विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाले आहेत. तरीही या सर्व विद्यार्थ्यांना एमबीबीएससाठी प्रवेश मिळाला आहे. यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांना खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे.
२०१७ मध्ये प्रवेश मिळालेल्या १९९० विद्यार्थ्यांच्या गुणांचे विश्लेषण केले असता असे दिसून आले की, त्यांचे गुण १५० पेक्षा कमी होते. ५३० असे विद्यार्थी दिसून आले, ज्यांचे फिजिक्स, केमिस्ट्री किंवा दोन्ही विषयांचे गुण शून्य किंवा सिंगल डिजिट होते. मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने एमबीबीएस प्रवेशासाठी ५० टक्के एवढ्या किमान गुणांची अट ठेवली होती. (राखीव जागांसाठी ४० टक्के) मात्र, मेडिकल कौन्सिलने २०१२ मध्ये यात बदल केले आणि किमान गुणांवरही प्रवेश होऊ लागले. त्याचा परिणाम असा झाला की, अनेक महाविद्यालयात शून्य किंवा सिंगल डिजिट गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळाला.
>ट्युशन फी
१७ लाख रुपये
एमबीबीएस प्रवेशासाठी १५० किंवा त्यापेक्षा अधिक गुण घेऊन प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची अनेक उदाहरणे आहेत. १५० किंवा त्यापेक्षा अधिक गुणांवर झालेल्या ५३० प्रवेशांपैकी ५०७ प्रवेश हे खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील आहेत. त्यांनी ट्युशन फी म्हणून सरासरी १७ लाख रुपये प्रति वर्ष प्रमाणे फी भरली आहे. यात होस्टेल, मेस, लायब्ररी आणि अन्य खर्च यांचा समावेश नाही. यातून असे दिसते की, नीटमध्ये कमी गुण मिळूनही केवळ पैशांच्या जिवावर विद्यार्थ्यांना मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे. यातील अर्ध्यापेक्षा अधिक विद्यार्थी डीम्ड युनिव्हर्सिटीतील असून, या युनिव्हर्सिटींना स्वत:ची परीक्षा घेण्याचा अधिकार आहे. जर या विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली, तर ते डॉक्टर म्हणून रजिस्ट्रेशन करू शकतात आणि प्रॅक्टिसही करू शकतात.