निष्काळजीपणाची हद्द झाली... कोरोनाबाधित आमदाराने घेतली योगींची भेट, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 08:18 PM2022-01-17T20:18:48+5:302022-01-17T20:19:53+5:30
जय मंगल कनौजिया हे कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतरही 15 जानेवारी रोजी गोरखपूर येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची त्यांनी भेट घेतली होती.
लखनौ - महाराजगंज जिल्ह्यातील भाजपाचे आमदार जय मंगल कनौजिया यांनी निष्काळजीपणाच्या सर्वच सीमा पार केल्याचं दिसून आलं. कोरोनाबाधित असतानाही ते सर्वत्र फिरत होते, लोकांना भेटत होते. त्यामुळे, नगरपालिाक मुख्याधिकारी यांच्या निर्देशानुसार कोतवाली पोलिसांनी कोरोना नियमावलींचे पालन न केल्याने आमदार कनौजियांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे महाशयांनी कोरोनाबाधित असतानाच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.
जय मंगल कनौजिया हे कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतरही 15 जानेवारी रोजी गोरखपूर येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची त्यांनी भेट घेतली होती. त्यामुळे, त्यांच्यावर कोरोना प्रोटोकॉल न पाळल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे, तेव्हापासून त्यांचा फोन स्वीच ऑफ आहे. लखनौ येथील त्यांच्या निवासस्थानी ते विलिगीकरणात असल्याचं काही निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे.
13 जानेवारी रोजी संबंधित आमदार कोरोना पॉझिटीव्ह आले होते. नगरपालिका क्षेत्रातील वीर बहादूर नगर परिसरातील रहिवाशी आहेत. ते पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या घराजवळील 100 मीटर परिसर कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला होता. मात्र, या महाशयांनी कोरोना नियमावलीचं उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. 15 जानेवारी रोजी खिचडी मेळाव्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. तसेच, गोरखपूर येथील मंदिराजवळ लागलेल्या यात्रेतही सहभाग घेतला होता. त्यामुळे, प्रशासनाकडून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांशी त्यांनी संपर्क केला आहे. कोरोनाबाधित असतानाही ते फिरत असल्याने त्यांच्या निष्काळजीपणाची चर्चा सर्वत्र होत आहे.