नेहरुंचा आणि बालदिनचा संबंध नाही, वीरबालदिनी मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य
By वासुदेव.पागी | Published: December 26, 2023 06:58 PM2023-12-26T18:58:38+5:302023-12-26T18:59:05+5:30
"पंडित नेहरूंचा आणि बालदिनाचा काहीच संबंध नाही. नेहरूंना गुलाब आणि मुले आवडायची म्हणून बालदिन साजरा केला जातो असेही सांगितले जाते. परंतु त्यालाही फारसा अर्थ नाही. वीरबालदिन हाच बालदिन ठरावा"
पणजी: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचा जन्मदिन हा बालदिन म्हणून साजरा केला जात असला तरी नेहरूंचा आणि बालदिनाचा काही संबंध नसल्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. खरे म्हणजे धर्मासाठी बलिदान केलेले गुरू गोविंद सिंग यांचे पुत्र जोरावर सिंग आणि फतेह सिंग या वीर बालकांचा बलिदान दिवस म्हणजेच वीरबाल दिवस. हा बालदिन म्हणूनही साजरा व्हायला हवा, असे त्यांनी म्हटले आहे. गोवा राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण महामंडळाच्या कार्यक्रमात बोलताना हे सांगितले.
या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी सांगितले की गुरूपुत्र जोरावर सिंह आणि जोरावर सिंह यांनी ८ आणि ५ वर्षे वयात धर्मासाठी मरण पत्करले, परंतु धर्मपरिवर्तन केले नाही. त्यांच्या या बलिदानामुळे मोगलाई हादरून गेली. त्यामुळे त्यांचा बलिदान दिवस हा वीरबाल दिवस म्हणून साजरा करण्याचा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदेश आहे, असे त्यांनी सांगितले. पंडित नेहरूंचा आणि बालदिनाचा काहीच संबंध नाही. नेहरूंना गुलाब आणि मुले आवडायची म्हणून बालदिन साजरा केला जातो असेही सांगितले जाते. परंतु त्यालाही फारसा अर्थ नाही. वीरबालदिन हाच बालदिन ठरावा असे त्यांनी सांगितले.