नेहरू देऊ शकले नव्हते ठोस पुरावे

By admin | Published: January 24, 2016 02:30 AM2016-01-24T02:30:04+5:302016-01-24T02:30:04+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सार्वजनिक केलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित १०० गोपनीय फाईल्समध्ये दडलेले रहस्य हळूहळू उलगडू लागले आहे.

Nehru could not give concrete proof | नेहरू देऊ शकले नव्हते ठोस पुरावे

नेहरू देऊ शकले नव्हते ठोस पुरावे

Next

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सार्वजनिक केलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित १०० गोपनीय फाईल्समध्ये दडलेले रहस्य हळूहळू उलगडू लागले आहे. यामधील एका दस्तावेजानुसार १९६२ साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नेताजींच्या कुटुंबियांना त्यांच्या निधनाची सूचना दिली होती. परंतु त्याला दुजोरा देणारे ठोस पुरावे ते देऊ शकले नव्हते. त्यानंतर नेताजींचे बंधू सुरेशचंद्र बोस यांनी पंडित नेहरूंना एक पत्र लिहून नेताजींच्या मृत्यूशी संबंधित पुरावे देण्याची विनंती केली होती. यावर नेहरूंनी १३ मे १९६२ ला सुरेशचंद्र बोस यांना पाठविलेल्या पत्रात परिस्थितीजन्य पुराव्यांवरून नेताजींच्या मृत्यूची पुष्टी होत असली तरी यासंदर्भात कुठलाही ठोस पुरावा आपल्याला देता येणार नाही, असे स्पष्ट केले होते.
नेहरूंनी लिहिलेल्या पत्रातील मजकूर असा, ‘मला १२ मे रोजीचे आपले पत्र मिळाले. आपण मला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचा पुरावा पाठविण्यास म्हटले आहे. पण मी आपणाला यासंदर्भात ठोस पुरावा देऊ शकत नाही. परिस्थितीजन्य पुरावे मात्र देऊ शकतो व चौकशी समितीच्या अहवालात ज्यांचा उल्लेख आहे त्यावरून नेताजींचे निधन झाले असावे असे वाटते. संपूर्ण भारत नेताजींचे स्वागत आणि त्यांना प्रेमाने जवळ घेण्यास आतुर असताना ते गुप्तपणे जीवन जगत असण्याची शक्यता धुसर आहे.

दस्तावेजांमधील आणखी काही माहिती
नेताजींची कन्या अनिता १९६० मध्ये भारतात आली होती व पंतप्रधान नेहरू यांच्यासोबत त्यांच्या सरकारी निवासस्थानात राहिली होती.
नेताजींच्या कुटुंबास काँग्रेस पक्ष दरमहा सहा हजार रुपये ‘स्टायपेंड’ देत होता. मात्र १९६५ मध्ये अनिताने विवाह केल्यानंतर ही रक्कम देणे बंद केले गेले.
नेताजींची पत्नी एमिली शेंका ही जर्मनीतील त्यांच्या वास्तव्यात त्यांची स्वीय सचिव होती.
एमिली यांनी काँग्रेसकडून रक्कम स्वीकारण्यास नकार दिला होता.

ते पत्र नेहरूंनी लिहिलेच नाही
नेताजींच्या खुल्या झालेल्या दस्तावेजांमध्ये सर्वाधिक
चर्चा भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी इंग्लंडचे त्यांचे समकक्ष क्लिमेंट एटली यांना लिहिले होते. या पत्रात नेताजींबाबत आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आला आहे. परंतु हे पत्र नेहरूंनी लिहिलेच नव्हते, असा काँग्रेसचा दावा आहे. हे पत्र खोटे असल्याचा आरोप करून सत्य उघड झाले पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी केली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा १८ आॅगस्ट १९४५ रोजी तायवानमधील एका विमान अपघातात मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. परंतु देशवासीयांनी हे स्वीकारलेले नाही.

नेताजींचा राजकारणासाठी वापर
नेताजींच्या नावाचा राजकीय लाभ मिळविण्याच्या हेतूने एक पूर्वनियोजित मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांनी हे समजून घेतले पाहिजे, असा दावा त्यांनी केला. वेगवेगळ्या सरकारच्या कार्यकाळात नेताजींसंदर्भात जे काही खुलासे झाले, माहिती समोर आली त्याची सर्वांनाच कल्पना आहे.
परंतु मूलभूत मुद्द्यांवरून देशवासीयांचे लक्ष विचलित करण्याचे चांगले तंत्र या सरकारला अवगत आहे. स्वत:चा कुठलाही इतिहास अथवा वारसा नसलेले लोकच यामागे आहे. या लोकांनी ना कधी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला ना बलिदान दिले, याकडे शर्मा यांनी लक्ष वेधले. सोबतच राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण त्यांनी करून दिले.
पंडित नेहरू हे केवळ भारताचे पहिले पंतप्रधानच नव्हते तर संपूर्ण जगासाठी एक राजनेता होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि इतर सहकाऱ्यांसोबत खऱ्या अर्थाने महानायक होते. हे सत्य कधीही नाकारता येणार नाही,असे प्रतिपादन त्यांनी केले.

नेताजींशी संबंधित गोपनीय फाईल्स सार्वजनिक करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. आपल्या ताब्यात अशा आणखी किती फाईल्स आहेत हेही सरकारने सांगावे. सरकारने नेताजींच्या अचानक बेपत्ता होण्यामागच्या रहस्याचाही उलगडा केला पाहिजे.
-जी. देवराजन, सचिव,
आॅल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक
माझ्यावर दबाव होता
मी गृहमंत्री असताना नेताजींशी संबंधित फायली खुल्या करू नयेत, यासाठी माझ्यावर दबाव होता.
-लालकृष्ण अडवाणी, भाजप

नेताजींच्या गोपनीय फाईल्स खुल्या करण्यामागे सरकारचा काहीतरी अंतस्थ हेतू नक्की आहे. स्वातंत्र्य लढ्याशी कवडीचाही संबंध नसलेल्या भाजपाची स्वातंत्र्य लढ्यादरम्यानच्या विविध विचारधारांमध्ये संघर्ष घडविण्याची इच्छा आहे. भाजप आपल्या राजकीय फायद्यासाठी हे सर्व करीत आहे.

-नितीशकुमार,
मुख्यमंत्री, बिहार

निर्णय योग्यच, पण...
सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित फायली उघड करण्याचा निर्णय योग्यच असल्याचे मत बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी व्यक्त केले. मात्र स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित असलेली मंडळी ही कागदपत्रे खुली करून, स्वातंत्र्य लढ्यातील मोठ्या नेंत्यांविषयी गोंधळ निर्माण करू इच्छित आहेत, असेही त्यांनी बोलून दाखवले.


नेताजींच्या गोपनीय फाईल्स खुल्या करणे स्वागतार्ह आहे. या १०० फाईल्स पूर्वीच खुल्या करण्यात आल्या असत्या तर त्यांच्याबाबतच्या अफवा पसरल्याच नसत्या. १९४५ मध्ये नेताजींच्या विमानाला झालेल्या अपघाताचे काही लोक प्रत्यक्षदर्शी होते. जपान सरकारने जगाला नेताजींच्या मृत्यूची बातमी दिली होती.
-कृष्णा, नेताजींचे पुतणे शिशिरकुमार बोस यांची
विधवा पत्नी.

Web Title: Nehru could not give concrete proof

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.