काश्मीर संकट परिस्थितीसाठी नेहरु-गांधी कुटुंब जबाबदार - भाजपा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 11:03 AM2017-07-22T11:03:24+5:302017-07-22T11:08:55+5:30
काश्मीरमध्ये सध्याच्या घडीला जी काही परिस्थिती आहे त्यासाठी नेहरु-गांधी आणि अब्दुल्ला कुटुंब जबाबदार असल्याचं भाजपाने म्हटलं आहे
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - काश्मीर मुद्दा सोडवण्यासाठी तिस-या पक्षाने मध्यस्थी करावी असं वक्तव्य केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाने (भाजपा) नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांना धारेवर धरलं आहे. फारुख अब्दुल्ला यांचं हे वक्तव्य अत्यंत बेजबाबदार असल्याचं भाजपाने म्हटलं आहे. भाजपा नेते सुधांशू त्रिवेदी यांनी तर, काश्मीरमध्ये सध्याच्या घडीला जी काही परिस्थिती आहे त्यासाठी नेहरु-गांधी आणि अब्दुल्ला कुटुंब जबाबदार असल्याचं सांगितलं आहे.
"फारुख अब्दुल्ला यांचं वक्तव्य अत्यंत बेजबाबदार आणि निषेधार्ह आहे. काश्मीर अजूनही धगधगतोय त्याच्यामागे अब्दुल्ला आणि नेहरु-गांधी कुटुंब कारण आहे", असं सुधांशू त्रिवेदी बोलले आहेत.
आणखी वाचा
भाजपा नेते दिलीप घोष यांनीही फारुख अब्दुल्ला यांच्यावर टीका केली आहे. अब्दुला यांचं वक्तव्य अर्थहिन असल्याचं ते बोलले आहेत. "फारुख अब्दुल्ला यांचं राजकारण काही कामाचं नाही. कधीतरी ते फुटीरवाद्यांच्या समर्थनार्थ बोलतात तर कधी पाकिस्तानच्या समर्थनार्थ बोलत असतात. त्यामुळे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवावा किंवा लक्ष द्यावं असं मला वाटत नाही", असं दिलीप घोष बोलले आहेत.
काय बोलले होते फारुख अब्दुल्ला ?
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी काश्मीर समस्येवर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलं होतं की, "भारताला काश्मीर समस्या सोडवायची असेल तर चीन किंना अमेरिकेची मदत घेतली पाहिजे".
अब्दुल्ला बोलले होते की, "आपण पाकिस्तान आणि चीनसोबत युद्द करु शकत नाही. कारण जर आपल्याकडे अणुबॉम्ब असतील तर त्यांच्याकडेही अणुबॉम्ब आहेत. त्यामुळे हा मुद्दा चर्चेने सोडवला गेला पाहिजे.
अब्दुल्ला यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी टीका करत संताप व्यक्त केला होता. जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी, मी फारुख अब्दुल्ला यांच्या वक्तव्याचा निषेध करतो असं सांगितलं होतं. जेव्हा फारुख अब्दुल्ला मुख्यमंत्री होते तेव्हा पाकिस्तानवर हल्ला केला पाहिजे असं बोलत होतं. आणि आता असं वक्तव्य करत आहेत.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही वक्तव्याचा निषेध करताना काश्मीरच्या वादात कोणत्याही तिसऱ्या पक्षाने हस्तक्षेप करण्याची गरजच नाही, असे सांगितले. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. काश्मीरला भारतापासून कोणीही वेगळे करू शकत नाही, असे सांगतच तिथे अस्थिरता निर्माण करण्यासाठी पाकतर्फे हालचाली सुरू असून, पाक व चीन यांच्यात जी गुप्त चर्चा सुरू आहे, त्यावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी कडाडून टीका होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या धोरणांमुळेच काश्मीरमध्ये हिंसाचार वाढला असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.