नेहरूंनी 8, इंदिरा गांधींनी 50, राजीव यांनी 9, तर...! का आणण्यात आलं 'एक देश एक निवडणूक' विधेयक? भाजपनं स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 16:13 IST2024-12-17T16:05:12+5:302024-12-17T16:13:52+5:30
गत काँग्रेस सरकारांनी कलम 356 चा वारंवार गैरवापर केल्याचा इतिहास पाहता, सरकारने 'एक देश, एक निवडणूक' विधेयक आणण्याचा निर्णय घेतला असल्याचे राज्यसभेतील नेते तथा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटले आहे.

नेहरूंनी 8, इंदिरा गांधींनी 50, राजीव यांनी 9, तर...! का आणण्यात आलं 'एक देश एक निवडणूक' विधेयक? भाजपनं स्पष्टच सांगितलं
'एक देश एक निवडणूक' अर्थात 'वन नेशन, वन इलेक्शन' विधेयक आज (मंगळवार) लोकसभेत सादर करण्यात आले. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक लोकसभेत सादर केले. यानंतर, काँग्रेससह विरोधी बाकावरील अनेक पक्षांनी या विधेयकाला विरोध दर्शवला आहे. दरम्यान, गत काँग्रेस सरकारांनी कलम 356 चा वारंवार गैरवापर केल्याचा इतिहास पाहता, सरकारने 'एक देश, एक निवडणूक' विधेयक आणण्याचा निर्णय घेतला असल्याचे राज्यसभेतील नेते तथा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटले आहे.
भारतीय संविधानाच्या 75 वर्षांच्या गौरवशाली प्रवासासंदर्भात राज्यसभेत सुरू असलेली चर्चा दुसऱ्या दिवशी पुढे घेऊन जाताना नड्डा यांनी काँग्रेसवर थेट हल्ला चढवला. नड्डा म्हणाले, "आज आपण 'एक देश, एक निवडणूक'च्या विरोधात उभे आहात. खरे तर, आपल्यामुळेच 'एक देश, एक निवडणूक' विधेयक आणावे लागले. कारण 1952 ते 1967 या काळात देशात एकाच वेळी निवडणुका होत होत्या. कलम 356 चा वापर करून तुम्ही (काँग्रेस) वारंवार राज्यांतील निवडून आलेली सरकारं पाडली आणि असे करून त्या राज्यांत स्वतंत्र निवडणुकांची परिस्थिती निर्माण केली."
काँग्रेस सरकारांनी कलम 356 चा 90 वेळा वापर केला -
भाजपाध्यक्ष नड्डा पुढे म्हणाले, काँग्रेस सरकारांनी कलम 356 चा 90 वेळा वापर केला. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी कलम 356चा 8 वेळा, इंदिरा गांधींनी 50 वेळा, राजीव गांधींनी 9 वेळा, तर मनमोहन सिंग यांनी 10 वेळा कलम 356चा गैरवापर केला. एवढेच नाही तर, 'राज्यघटनेच्या 75 वर्षांच्या गौरवशाली प्रवासात या गोष्टींचा उल्लेख व्हायला हवा, (लोकांन) माहीत व्हायला हवे की, तुम्ही निवडून आलेल्या सरकारांना एकदा नव्हे तर वारंवार कशा पद्धतीने पाडले आणि देशाला अडचणीत आणले.
आणीबाणीचा उल्लेख करत नड्डा म्हणाले, "देशावर काही संकट आले होते का की देशावर आणीबाणी थोपवली गेली? नाही... देशाला कसलाही धोका नव्हता, खुर्चीला धोका होता. किस्सा खुर्चीचा होता. जिच्यासाठी संपूर्ण देशाला अंधकारात ढकलण्यात आले."
तुम्हाला वेळेपूर्वी सांगतो की, तुम्ही 25 जून 2025 रोजी लोकशाही विरोधी दिनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हा" -
नड्डा म्हणाले, "काँग्रेसचे सदस्यं म्हणतात की, त्यांच्या नेत्याने आणीबाणीची चूक मान्य केली आहे, त्यामुळे याचा वारंवार उल्लेख केला जाऊ नये. पण, आणीबाणीच्या काळात लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न झाला. आपल्या मनात जर प्रायश्चित्ताची जराही भावना असे, तर मी आवाहन करतो… आणि तुम्हाला वेळेपूर्वी सांगतो की, तुम्ही 25 जून 2025 रोजी लोकशाही विरोधी दिनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हा."
उल्लेखनीय आहे की, गेल्या वर्षी सरकारने 25 जून हा 'संविधान हत्या दिन' म्हणून घोषित केला होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर 25 जून 1975 ते 21 मार्च 1977 पर्यंत आणीबाणी लादली होती.