स्वातंत्र्यासाठी नेहरु, सुभाषचंद्र बोस फासावर चढले, जावडेकरांनी बदलला इतिहास
By Admin | Published: August 23, 2016 01:18 PM2016-08-23T13:18:31+5:302016-08-23T14:29:32+5:30
भारताच्या स्वातंत्र्यढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांबद्दल बोलताना सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल आणि पंडीत जवाहरलाल नेहरुंचा प्रकाश जावडेकरांनी शहीद म्हणून उल्लेख केला
- ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. 23 - केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्वातंत्र्यावर बोलताना इतिहासच बदलून टाकला आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांबद्दल बोलताना नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरुंचा प्रकाश जावडेकरांनी शहीद म्हणून उल्लेख केला. जावडेकर एवढ्यावरच थांबले नाही तर ते फासावर चढले होते असंही म्हणाले आहेत.
मध्यप्रदेशमधील छिंदवारा येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा यात्रेत प्रकाश जावडेकर बोलत होते. 'स्वातंत्र्यासाठी 1857 मध्ये लढ्याला सुरुवात झाली. 90 वर्षांनी लढा संपला आणि आपण ब्रिटिशांना देशातून बाहेर काढलं. नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, पंडित जवाहरलाल नेहरु, भगत सिंग आणि राजगुरु यांच्यासहित ते सर्व जे फासावर चढले, त्या सर्व शहिदांना मी सलाम करतो', असं वक्तव्य प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे.
प्रकाश जावडेकर यांनी सुभाषचंद्र बोस यांनादेखील शहिदांच्या यादीत टाकून दिलं. विशेष म्हणजे सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं गुढ अजून कायम असून सरकारने या विषयावर मौन बाळगलं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस जिवंत आहेत की मृत याची सरकारने कोणतीच अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.
#WATCH HRD Min Prakash Javadekar says "SC Bose, Sardar Patel, Nehru, Bhagat Singh, Rajguru sabhi phaansi par chade"https://t.co/JSgXjcVmAm
— ANI (@ANI_news) August 23, 2016
प्रकाश जावडेकर या तिरंगा यात्रेत स्कुटी चालवत सहभागी झाले होते. नियमाचं पालन करत त्यांनी हेल्मेट घातलं होतं. मात्र मोठ्या संख्येने जमा झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केलं होतं. अनेकांनी विना हेल्मेट दुचाकी चालवली होती.