नेहरूंची ध्येयधोरणे आजही समकालीन
By admin | Published: November 18, 2014 11:58 PM2014-11-18T23:58:38+5:302014-11-18T23:58:38+5:30
यावेळी काँग्रेसकडून घोषणापत्र जारी करण्यात आले़ घानाचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉनकुफोर यांनी घोषणापत्राचे वाचन केले़
नवी दिल्ली : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त काँग्रेसने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय संमेलनाच्या आजच्या (मंगळवारी) दुस-या दिवशी पक्ष उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर अप्रत्यक्ष हल्ला चढवला़ इतिहासातून नेहरूंची विचारधारा पुसून टाकण्याचे प्रयत्न काही लोकांकडून सुरूअसल्याचा आरोप राहुल यांनी केला़ नेहरूंचे विचार आजही समकालीन असल्याचेही ते म्हणाले़
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्या समारोपीय भाषणात, नेहरूंच्या ध्येयधोरणांच्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले़ आपल्याला केवळ नेहरूंच्या विचारधारेची कास धरायची नाही, तर लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता वाढीसाठी संघर्षही करायचा आहे, असे त्या म्हणाल्या़
यावेळी काँग्रेसकडून घोषणापत्र जारी करण्यात आले़ घानाचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉनकुफोर यांनी घोषणापत्राचे वाचन केले़
नेहरूंचे जागतिक विचार आणि त्यांचा वारसा यावरील आंतरराष्ट्रीय संमेलनात भाग घेणारे आम्ही २० देश, २९ राजकीय पक्ष आणि संघटनांचे प्रतिनिधी हिंसा नाकारून शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने नेहरूंच्या विचारांवर चालण्याचा, त्यांची मूल्ये आत्मसात करण्याचा आणि त्यांचा वारसा जपण्यासाठी प्रयत्न करू, असे या घोषणापत्रात म्हटले आहे़ काँग्रेसने आयोजित केलेल्या संमेलनात अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई, घानाचे जॉन कुफोर, नायजेरियाचे जनरल ओबासांजो, नेपाळचे माजी पंतप्रधान माधव नेपाळ, भूतानच्या क्वीन मदर ओ डब्ल्यू बाँचुक, पाकिस्तानच्या मानवाधिकार कार्यकर्त्या अस्मा जहांगीर, दक्षिण आफ्रिकेचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी अहमद काथराडा यांच्यासह ५२ देशांतील नेते व प्रतिनिधी सहभागी झाले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)