यह पडोसी ऐसा है की मानता ही नहीं!
By admin | Published: August 6, 2016 03:56 AM2016-08-06T03:56:13+5:302016-08-06T03:56:13+5:30
‘यह पडोसी ऐसा है की मानता ही नही’ परमेश्वर पाकिस्तानला सद्बुद्धी देवो इतकीच कामना आहे, असे गृहमंत्री राजनाथसिंह संसदेच्या दोन्ही सभागृहांत म्हणाले.
सुरेश भटेवरा/ शीलेश शर्मा,
नवी दिल्ली- इस्लामाबादेत सार्क देशांच्या गृहमंत्र्यांच्या संमेलनात भारताचा प्रतिनिधी या नात्याने मला जे काही सांगावेसे वाटले, ते ठामपणे मी सांगून आलो. तिथे जे काही घडले ते योग्य नसले तरी त्याविषयी मी तक्रारीचा सूर कोणाकडेही व्यक्त केला नाही. माझ्या विरोधात निदर्शने होणार असल्याची कल्पना होती मात्र त्याची चिंता मनात असती तर मी तिथे गेलोच नसतो. भारताच्या प्रतिष्ठेला शोभेल अशा मर्यादेत मी वागलो पण ‘यह पडोसी ऐसा है की मानता ही नही’ परमेश्वर पाकिस्तानला सद्बुद्धी देवो इतकीच कामना आहे, असे गृहमंत्री राजनाथसिंह संसदेच्या दोन्ही सभागृहांत म्हणाले.
पाकिस्तानात सार्क देशांच्या गृहमंत्र्यांच्या संमेलनाहून परतल्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांत राजनाथसिंहांनी आपल्या पाकिस्तान दौऱ्याविषयी सविस्तर निवेदन केले. संमेलनात पाकिस्तानला थेट खडे बोल ऐकवणाऱ्या गृहमंत्री राजनाथसिंह यांची सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यसभेत एकमुखाने प्रशंसा केली. स्वदेशात आमच्यात कितीही मतभेद असले तरी परदेशाच्या भूमीवर आमच्या गृहमंत्र्यांना कोणी अपमानास्पद वागणूक देत असेल तर त्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो, अशी भूमिका विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्यासह तमाम पक्षाच्या नेत्यांनी राज्यसभेत मांडली.
>भारताची बरोबरी नाहीच
गृहमंत्री म्हणाले, ‘सार्कच्या एका देशात जो दहशतवादी आहे तो दुसऱ्या देशात हुतात्मा कसा ठरू शकतो? असा सवाल उपस्थित करीत संमेलनात मी म्हणालो, दहशतवाद अखेर दहशतवादच.
तो चांगला अथवा वाईट नसतो. मानवतेच्या विरोधातल्या अशा विषवल्ली आपण सर्वांनी एकत्र येऊन उखडून फेकल्या पाहिजेत. दहशतवाद्यांच्या प्रत्यर्पणासाठी कडक नियम बनवण्याची मागणीही याप्रसंगी मी केली.’
पाकच्या गृहमंत्र्यांनी संमेलनानंतर सार्क देशांच्या गृहमंत्र्यांना दुपारच्या भोजनासाठी निमंत्रित केले मात्र ते स्वत: एका गाडीत बसून निघून गेले तेव्हा भोजन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे मी टाळले आणि सरळ परत निघून आलो.
जे घडले ते घडले. त्याविषयी अधिक काही बोलणे मला प्रशस्त वाटत नाही. पाकिस्तानमध्ये मिळालेल्या वर्तणुकीवर भाष्य न करता मी इतकेच म्हणेन की आतिथ्याच्या व शिष्टाचाराच्या बाबतीत भारताची बरोबरी कोणी करू शकत नाही.