"ना केजरीवालांनी इन्सुलिन मागितलं, ना एम्सच्या डॉक्टरांनी..."; तिहार जेल प्रशासनाचं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 04:40 PM2024-04-21T16:40:03+5:302024-04-21T16:41:07+5:30
Avind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांनी मिठाई, लाडू, केळी, आंबे, तळलेले अन्न, चहा, लोणचं इत्यादी उच्च कोलेस्टेरॉलयुक्त पदार्थ खाऊ नयेत असे तिहार तुरुंग प्रशासनाने एम्सला पत्र लिहिले आहे.
तिहार तुरुंगातील सूत्रांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल एम्सच्या वरिष्ठ डायबेटोलॉजिस्टकडून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कंसल्टेशन देण्यात आलं आहे. तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 40 मिनिटांच्या कंसल्टेशननंतर डॉक्टरांनी अरविंद केजरीवाल यांना कोणतीही गंभीर चिंता करण्याच कारण नसल्याचं सांगितलं आणि त्यांना सांगितलेली औषधं सुरू ठेवण्याचा सल्ला दिला. जेल प्रशासन त्यांच्या प्रकृतीवर नियमितपणे लक्ष ठेवून आहे.
सुनीता केजरीवाल यांच्या विनंतीवरून तिहार तुरुंग प्रशासनाने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचं VC मार्फत डॉक्टरांशी कंसल्टेशन केलं. एम्सच्या वरिष्ठ तज्ञांव्यतिरिक्त, आरएमओ तिहार आणि एमओ तिहार हे व्हीसी दरम्यान उपस्थित होते. डॉक्टरांनी CGM (ग्लूकोज मॉनिटरिंग सेन्सर) चे रेकॉर्ड आणि केजरीवाल यांनी घेतलेल्या आहार आणि औषधांचा रेकॉर्ड घेतला. या काळात अरविंद केजरीवाल यांनी इन्सुलिनचा मुद्दा उपस्थित केला नाही किंवा डॉक्टरांनी त्यांना ते वापरण्यास सुचवले नाही.
तिहारच्या सूत्रांच्या वक्तव्यावर आम आदमी पार्टीची प्रतिक्रियाही समोर आली आहे. आपच्या सूत्रांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, तिहार तुरुंग प्रशासनाने मान्य केले आहे की मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 20 दिवस डायबेटीस तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवण्यात आलं नाही. त्यांच्या जीवाला जाणीवपूर्वक धोका निर्माण केला जात आहे. त्याची शुगर लेव्हल 300 आहे, मग त्यांना इन्सुलिन का दिले जात नाही? आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी काल पत्रकार परिषद घेऊन जेलमध्ये असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट केंद्र सरकारने रचल्याचा आरोप केला.
संजय सिंह म्हणाले, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंगात इन्सुलिन दिले जात नाही. डायबेटीसच्या रुग्णाला वेळेवर इन्सुलिन न दिल्यास त्या व्यक्तीसाठी जीवन किंवा मृत्यूचा प्रश्न निर्माण होतो. त्यांना मारण्याचा कट रचला जात आहे. या गुन्ह्याचे उत्तर दिल्लीतील जनता देईल. आप नेत्यांच्या आरोपांदरम्यान, तिहार जेल प्रशासनाने शनिवारी दिल्लीच्या उपराज्यपालांना सीएम केजरीवाल यांच्या प्रकृतीबाबत अहवाल सादर केला, जे यावर्षी 1 एप्रिलपासून तिहार जेलमध्ये आहेत.
त्या अहवालानुसार, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तेलंगणातील डॉक्टरांच्या सल्ल्याने इन्सुलिन रिव्हर्सल प्रोग्रामवर होते. त्यांच्या अटकेच्या खूप आधी डॉक्टरांनी त्यांचा इन्सुलिनचा डोस बंद केला होता. त्यांच्या अटकेच्या वेळी, ते फक्त मेटफॉर्मिन ही गोळी घेत होते. केजरीवाल यांची तपासणी केल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांनी असेही सांगितले की, केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडीत ठेवल्यापासून त्यांची शुगर लेव्हल चिंताजनक नाही आणि त्यांना इन्सुलिन घेण्याची गरज नाही.
अरविंद केजरीवाल यांनी मिठाई, लाडू, केळी, आंबे, तळलेले अन्न, चहा, लोणचं इत्यादी उच्च कोलेस्टेरॉलयुक्त पदार्थ खाऊ नयेत असे तिहार तुरुंग प्रशासनाने एम्सला पत्र लिहिले आहे. त्यांच्यासाठी हेल्दी डाइट प्लॅन विचारण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात जेलमध्ये आहेत.