ना रस्ता ना पुल, गर्भवती महिलेला खांद्यावर घेऊन पार करावी लागली नदी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 01:11 PM2020-07-25T13:11:11+5:302020-07-25T13:11:54+5:30
पुराचा फटका एका गर्भवती महिलेला बसला असून, वाहतुकीचे सर्व मार्ग बंद झाल्याने तिला रुग्णालयात पोहोचवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
हैदराबाद - देशातील विविध भागात सध्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे. दरम्यान, तेलंगाणालाही मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांना फटका बसला आहे. भद्रादी, कोथागुडेम जिल्ह्यांत अनेक तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठले असून, किन्नरसानी, मल्लन्ना, वगू हे भाग एडू मेलिकाला वागू तलावाच्या वाढलेल्या पाण्यामुळे प्रभावित झाले आहेत. तसेच नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने गावांमधील वाहतूक प्रभावित झाली आहे. तसेच गुंदला भागात मल्लन्ना वगू तलावात आलेल्या पुरामुळे तात्पुरता बनवलेला पूल वाहून गेला आहे.
नदीत पाणी भरल्याने या भागातील लोकांना खूप अडचणीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, या पुराचा फटका एका गर्भवती महिलेला बसला असून, वाहतुकीचे सर्व मार्ग बंद झाल्याने तिला रुग्णालयात पोहोचवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आठ महिन्यांची गर्भवती असलेल्या नुनवत ममता या महिलेला रुग्णालयात जायचे होते. मात्र जाण्यासाठी कुठलेही साधन न मिळाल्याने तिचे कुटुंबीय तिला दुचाकीवरून रुग्णालयात नेत होते.
मात्र ते मल्लन्ना वगू तलावाजवळ आले असताना येथे उभारण्यात आलेला तात्पुरता पूल वाहून गेल्याचे त्यांनी पाहिले. त्यामुळे आता पलिकडे असलेल्या रुग्णालयात या महिलेला कसे घेऊन जायचे हा प्रश्न तिच्या कुटुंबीयांसमोर उभा राहिला. अखेरीस या महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी जीव धोक्यात घालून नदी पार करण्याचा निर्णय घेतला. अखेरीस दुथडी भरून वाहत असलेली ही नदी पार करून ते पैलतीरी पोहोचले.
पावसाळ्यामध्ये या भागात राहणाऱ्या आदिवासींनी सरकारी रुग्णालयात जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या भागातील सरकारी रुग्णालय हे गावापासून आठ किलोमीटर दूर आहे. पावसाळ्यामध्ये मनुगुरू, नरसम्पेता, वारंगल आदी परिसरातील दळणवळण ठप्प होते. मात्र कुठलीही योजना येथे अद्याप पोहोचू शकलेली नाही.