नेपाळ व भूतानमधील जुन्या नोटा स्वीकारणार
By admin | Published: February 19, 2017 01:45 AM2017-02-19T01:45:14+5:302017-02-19T01:45:14+5:30
५०० आणि १,००० रुपयांच्या रद्द केलेल्या जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी नेपाळ आणि भूतान यांच्याकडून येत असलेल्या दबावापुढे झुकत भारताने अखेर या नोटा स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली : ५०० आणि १,००० रुपयांच्या रद्द केलेल्या जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी नेपाळ आणि भूतान यांच्याकडून येत असलेल्या दबावापुढे झुकत भारताने अखेर या नोटा स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारमधील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही देशांतील नागरिकांकडे असलेल्या जुन्या नोटा स्वीकारण्याचा मुद्दा कळीचा बनला होता. दोन्ही देशांतील उच्चस्तरीय चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर भारत सरकारने जुन्या नोटा स्वीकारण्यास तत्त्वत: मंजुरी दिली. मात्र, वैयक्तिकरीत्या किंवा कंपन्यांना मर्यादित संख्येच्या नोटांसाठी तसेच मर्यादित कालावधीसाठी ही सुविधा असेल. भारतीय नागरिकांना जसे ८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबरपर्यंत नोटा जमा करण्याची सूट होती, तसे नेपाळ-भूतानमध्ये अशी सूट खूप कमी कालावधीसाठी असेल.
भारताचा नेपाळ-भूतानशी भारतीय चलन व्यवहाराचा करार आहे. सूत्रांनुसार, भारत व नेपाळमध्ये द्विपक्षीय करारानुसार, नेपाळ दरवर्षी ६०० कोटी रुपयांचे भारतीय चलन डॉलर्स देऊन खरेदी करू शकतो. २००१ मध्ये हा करार झाला होता. भारताला किमान १०,००० कोटी रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकाराव्या लागतील. दुसरे म्हणजे भारतीय चलन हे नेपाळ आणि भूतानमध्ये स्थानिक चलन म्हणून व्यवहारात आहे. या देशांनी त्यांच्याकडील भारताच्या जुन्या नोटांची माहिती दिलेली आहे. आणि सरकारने हे प्रथमच कबूल केले आहे. मात्र, दोन्ही देशांकडील किती जुन्या नोटा स्वीकारायच्या याबाबत बोलणी सुरू आहे.