भारत-नेपाळ सीमेवर कारमध्ये आढळले २८ मानवी सांगाडे!, दोन्ही देशांचे सुरक्षा जवान हादरले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 06:39 PM2021-10-09T18:39:45+5:302021-10-09T18:40:58+5:30
भारतीय सुरक्षा दलाना याप्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली असून इतक्या मोठ्या प्रमाणात मानवी सांगाड्यांनी भरलेली एक कार सहजपणे नेपाळमध्ये कशी दाखल झाली?
बिहारच्या अररिया येथे भारत-नेपाळ सीमेवर एकाच जागेवर मोठ्या प्रमाणात मानवी सांगाडे आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. एका कारमध्ये मानवी सांगाडे ठेवण्यात आले होते. सांगाड्यांनी भरलेल्या या कारवर सर्वात आधी नेपाळ सुरक्षा दलाच्या जवानांची नजर पडली. नेपाळच्या जवानांनी तात्काळ याची माहिती सीमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांना दिली. कारण ज्या कारमधून इतक्या मोठ्या प्रमाणात मानवी सांगाडे जप्त करण्यात आले आहेत ती कार भारतीय सीमेतून नेपाळमध्ये आली होती.
भारतीय सुरक्षा दलाना याप्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली असून इतक्या मोठ्या प्रमाणात मानवी सांगाड्यांनी भरलेली एक कार सहजपणे नेपाळमध्ये कशी दाखल झाली? असा प्रश्न सुरक्षा अधिकाऱ्यांना पडला आहे. ज्या सीमेवर कार सापडली आहे ती सीमा देखील कोरोनामुळे जवळपास दीड वर्षांपासून पूर्णपणे बंद होती. काही दिवसांपूर्वीच सीमेवरील ये-जा पूर्ववत करण्यात आली आहे. त्यात आता इतक्या मोठ्या प्रमाणात मानवी हाडांनी भरलेली कार सापडल्यानं दोन्ही सुरक्षा दलाचे जवान सतर्क झाले आहेत.
कशी सापडली हाडांनी भरलेली कार?
सुत्रांच्या माहितीनुसार, मानवी सांगाड्यांनी भरलेली कार ४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सापडली आहे. भारतीय सीमा ओलांडून एक कार नेपाळच्या सीमेत पोहोचली होती. या कारची तपासणी केली असता नेपाळच्या सुरक्षा जवानांना कारमध्ये मानवी हाडांचे सांगाडे सापडले. नेपाळच्या जवानांनी त्याची मोजणी केली असता जवळपास २८ नर सांगाडे सापडले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात सांगाडे पाहून नेपाळचे जवान हादरलेच. त्यांनी तातडीनं भारतीय सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. भारतीय जवान घटनास्थळी पोहोचले असता नेपाळच्या सुरक्षा रक्षकांनी दिलेली माहिती खरी निघाली आणि ते पाहून त्यांनाही आश्चर्याचा धक्काच बसला. जप्त करण्यात आलेल्या हाडांमध्ये बहुतांश मानवी कवटी आणि मांड्यांच्या हाडांचा सर्वाधिक समावेश आहे. दरम्यान, एसएसबीच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कार भारतातून नेपाळला गेल्याचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. एसएसबीची टीम संबंधित घटनेची चौकशी करत आहे.