नेपाळमध्ये भूकंपाचा हैदोस, ७०० ठार, भारतातही ३४ दगावले

By admin | Published: April 25, 2015 12:26 PM2015-04-25T12:26:01+5:302015-04-25T18:09:39+5:30

नेपाळसह भारतभरात आज सकाळी भूकंपाचे तीव्र धक्के बसले असून नेपाळमध्ये ७०० जण दगावल्याची भीती आहे.

Nepal has seven earthquake hits, 34 dead in India | नेपाळमध्ये भूकंपाचा हैदोस, ७०० ठार, भारतातही ३४ दगावले

नेपाळमध्ये भूकंपाचा हैदोस, ७०० ठार, भारतातही ३४ दगावले

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - नेपाळसह उत्तर व पूर्व भारतात आज सकाळी साडेअकराच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के बसले. आत्तापर्यंत नेपाळमध्ये सुमारे ७०० जण दगावल्याची भीती नेपाळमधल्या अधिका-यांनी व्यक्त केली आहे. तर बिहार, पश्चिम बंगाल व उत्तर प्रदेशमध्ये ३४ जण दगावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. काठमांडूपासून ८० किलोमीटरवर भूकंपाचा केंद्रबिंदू असून तेथील अनेक इमारती कोसळल्या तर भारतात सिक्कीम, पश्चिम बंगाल,  दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, उत्तराखंड,  सिक्कीम येथे सुमारे दोन मिनिटे भूकंपाचे धक्के बसत होते. या संकटाचा सामना करण्यासाठी नेपाळमध्ये आणिबाणी जाहीर करण्यात आली आहे.
भारतीय सैन्याची मदत देणारी विमाने काठमांडूला रवाना झाली असून नेपाळला लागणारी सगळ्या प्रकारची मदत भारत करणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. भारतीय हवाई दलाची मदत प्रामुख्याने घेण्यात येत असून चार टन मदत साहित्य तातडीने रवाना झाले आहे. यामध्ये खाण्यापिण्याच्या साहित्याबरोबरच ढिगारे उपसण्यासाठी लागणा-या साहित्याचा समावेश आहे.
याखेरीज डॉक्टर्स आणि वैद्यकीय साहित्यही रवाना होत असल्याचे अधिका-यांनी सांगितले आहे.
काठमांडूमधला 190 वर्ष जुना असलेला धराहर टॉवर कोसळला असून शेकडोंच्या संख्येने पर्यटक या टॉवरवर होते असे सांगण्यात येत आहे. जवळपास 400 प्रवासी टॉवरमध्ये अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. काठमांडूसह नेपाळमध्ये हजारो भारतीय पर्यटक व भाविक नेपाळमध्ये गेले असून त्यांच्या सुरक्षेबाबत अद्याप सविस्तर माहिती मिळालेली नाही.
नेपाळची राजधानी काठमांडूपासून ८१ किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू असून भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.९ इतकी मोजण्यात आली आहे. काठमांडू येथे अनेक इमारतींची पडझड झाल्याने मोठे नुकसान झाले असून काही जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या भूकंपानंतर नेपाळकडे जाणारी सर्व विमाने भारताच्या दिशेन वळवण्यात आली आहेत. 
तर भारतात दिल्ली शहरात भूकंपाची तीव्रता सर्वात जास्त जाणवली, भूकंपामुळे तीन ते चार मिनिटापर्यंत दिल्लीतील घरे व कार्यालयांचा परिसर हादरत होता. खबरदारी म्हणून दिल्ली मेट्रो सेवा बंद ठेवण्यात आली आहे.  दरम्यान महाराष्ट्रात नागपूर व अकोला येथेही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सुदैवाने अद्याप कोठेही जीवितहानी झालेली नसली तरी भूकंपामुळे भयभीत झालेल्या नागरिकांनी रस्त्यावर पळ काढल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.  अनेक ठिकाणी घरातील फर्निचर व सामान खाली कोसळले तसेच कार्यालयातील कॉम्प्युटर स्क्रीन्स व भिंती हादरत होत्या.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूकंपग्रस्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली आहे. तसेच भूकंपामुळे झालेल्या नुकसानाची माहिती घेत असून भूकंपग्रस्तांपर्यंत तत्काळ मदत पोचवण्यात येईल अशी माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली आहे. 
नेपाळमधील भारतीय दूतावासाचा हेल्पलाईन क्रमांक : +977- 9851107021, +977- 9851135141
 

 

Web Title: Nepal has seven earthquake hits, 34 dead in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.