भारताच्या नव्या नकाशास आता नेपाळचाही आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 05:56 AM2019-11-08T05:56:24+5:302019-11-08T05:56:52+5:30
नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी एका निवेदनात म्हटले की
काठमांडू/नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या फेररचनेनंतर देशातील २८ राज्ये व नऊ केंद्रशासित प्रदेश दाखविणाऱ्या भारताने गेल्या आठवड्यात प्रसिद्ध केलेल्या नव्या राजकीय नकाशास पाकिस्तान व चीननंतर आता नेपाळनेही आक्षेप घेतला आहे. भारताने मात्र हा आक्षेप फेटाळून लावला आहे.
नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी एका निवेदनात म्हटले की, आमच्या देशाच्या अगदी पश्चिम टोकाला असलेला कालापाणी हा प्रदेश भारताने आपल्या हद्दीत दाखविला आहे. कालापाणी आमचेच असल्याने नकाशात दाखविलेल्या सीमांना आमचा आक्षेप आहे. दोन्ही देशांचा सीमावाद सोडविण्यासाठी परराष्ट्रमंत्र्यांच्या पातळीवर चर्चा करण्याची स्थायी यंत्रणा आहे. भारताने त्याचा आदर करावा, अशी अपेक्षा आहे. नेपाळच्या म्हणण्यानुसार कालापाणी त्यांच्या दारचुला जिल्ह्यात आहे; पण नव्या नकाशात भारताने ते उत्तराखंडच्या पिठोरगढ जिल्ह्यात दाखविले आहे. (वृत्तसंस्था)
सीमेत फेरबदल नाही
नेपाळचा हा आक्षेप अमान्य करताना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले की, नकाशात भारताचा सार्वभौम प्रदेश अचूकपणे दाखविलेला आहे. नव्या नकाशात भारत व नेपाळ यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमेत कोणताही फेरबदल केलेला नाही.