हृदयद्रावक! 2 मुलींनंतर मुलगा झाला, नवस पूर्ण करायला गेला अन् विमान अपघातात जीव गमावला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 10:09 AM2023-01-16T10:09:38+5:302023-01-16T10:20:26+5:30
नेपाळ विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांपैकी सोनू जयस्वाल काठमांडू येथील पशुपतीनाथ मंदिरात पुत्रप्राप्तीचे व्रत पूर्ण केल्यानंतर दर्शनासाठी गेला होता.
पाच भारतीयांसह 72 प्रवासी असलेले नेपाळी प्रवासी विमान रविवारी पोखरा विमानतळावर उतरत असताना दरीत कोसळून 69 जणांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे पोखरा विमानतळाचे 15 दिवसांपूर्वीच 1 जानेवारीला उद्घाटन झाले होते. नेपाळ विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांपैकी सोनू जयस्वाल काठमांडू येथील पशुपतीनाथ मंदिरात पुत्रप्राप्तीचे व्रत पूर्ण केल्यानंतर दर्शनासाठी गेला होता. त्यांच्या कुटुंबीयांनी ही माहिती दिली. चक जेनाब गावातील 35 वर्षीय सोनू जैस्वाल याला दोन मुली आहेत आणि त्यांनी भगवान पशुपतीनाथ यांना मुलगा झाल्यास मंदिरात जाईन असा नवस केला होता.
सोनूचे नातेवाईक आणि गावचे प्रमुख विजय जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सोनू 10 जानेवारीला त्याच्या तीन मित्रांसह नेपाळला गेला होता. सोनूचा उद्देश भगवान पशुपतीनाथांच्या दर्शनाचा होता कारण त्याची मुलगा होण्याची इच्छा पूर्ण झाली होती. पण नशिबात त्याच्यासाठी काहीतरी वेगळं होतं. त्याचा मुलगा फक्त 6 महिन्यांचा आहे." सोनूचे जिल्ह्यात दारूचे दुकान आहे, त्याचे अलावलपूर चट्टी येथे घर आहे मात्र तो सध्या वाराणसीच्या सारनाथ येथे राहत होता.
जयस्वाल म्हणाले की, सोनूचे इतर तीन मित्र, 25 वर्षीय अभिषेक कुशवाह, 22 वर्षीय विशाल शर्मा आणि 27 वर्षीय अनिल कुमार राजभर यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. विजय जयस्वाल म्हणाले की, विमान अपघाताची बातमी पसरताच, जवळपास संपूर्ण गाव सोनूच्या घराबाहेर जमले आणि प्रार्थना केल्या कारण त्यांना आशा होती की तो बरा होईल. जिल्हा प्रशासनाचे अधिकारी नंतर दुःखद बातमी घेऊन आले. "सोनूची पत्नी आणि मुलांना या घटनेची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. ते दुसऱ्या घरात आहेत," असे त्यांनी सांगितले.
लोकप्रिय पर्यटन स्थळ पोखरा येथे पॅराग्लायडिंगचा आनंद घेतल्यानंतर सोनू आणि त्याचे तीन मित्र मंगळवारी गाझीपूरला परतणार होते, असे गावकऱ्यांनी सांगितले. नेपाळमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोखराला जाण्यापूर्वी हे चौघे पशुपतीनाथ मंदिराजवळील गोशाळेत आणि नंतर थमेल येथील हॉटेल डिस्कव्हरी इनमध्ये थांबले होते. ते म्हणाले की पोखराहून गोरखपूरमार्गे भारतात परतण्याचा त्यांचा विचार होता. यति एअरलाईन्सचे प्रवक्ते सुदर्शन बरतौला यांनी सांगितले की, अद्याप कोणीही वाचले नसल्याची माहिती मिळालेली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"