भारताच्या नोटाबंदीमुळे नेपाळ आर्थिक संकटात
By admin | Published: January 15, 2017 12:19 AM2017-01-15T00:19:57+5:302017-01-15T00:19:57+5:30
चलनातून ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा बाद करण्याच्या भारताच्या निर्णयामुळे शेजारच्या नेपाळमध्ये संकट उभे ठाकले आहे. आपल्याकडील ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा
- नितीन अग्रवाल, नवी दिल्ली
चलनातून ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा बाद करण्याच्या भारताच्या निर्णयामुळे शेजारच्या नेपाळमध्ये संकट उभे ठाकले आहे. आपल्याकडील ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा भारताकडून बदलून घेण्यासाठी सतत प्रयत्न करीत असलेल्या नेपाळने लवकरच हा प्रश्न सुटला नाही तर नेपाळी लोकांचा भारतावरील विश्वास उडून जाईल, असा इशारा दिला आहे.
नेपाळचे भारतातील राजदूत दीप कुमार उपाध्याय म्हणाले की, भारत सरकारला विनंती करतो की हा प्रश्न लवकर सोडवावा अन्यथा नेपाळी लोकांचा आधी नेपाळ सरकारवरून आणि भारत सरकारवरील विश्वास उडून जाईल.’’
ते म्हणाले की, नोटाबंदीमुळे नेपाळमध्ये लोकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी नेपाळ राष्ट्र बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरांच्या नेतृत्वाखाली अर्थ आणि परराष्ट्र मंत्रालयाचे अनेक वरिष्ठ अधिकारी भारतात येऊन गेले. हे अधिकारी रिझर्व्ह बँक, अर्थ आणि परराष्ट्र मंत्रालयाशी उत्तर शोधण्यासाठी चर्चा करीत आहेत. आम्ही हा प्रश्न सोडवू, असे आश्वासन भारत सरकारने आम्हाला दिली असल्याची माहितीही उपाध्याय यांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
- नेपाळ भारतीय रिझर्व्ह बँकेकडून दरवर्षी अमेरिकन डॉलरच्या बदल्यात सरासरी ६०० कोटी रुपये मूल्यांच्या भारतीय नोटा घेतो. भारताच्या निर्णयामुळे नेपाळ राष्ट्र बँकेची फार मोठी रक्कम चलनातून बाद झाली आहे. नेपाळमध्ये काही लोक घसघशीत कमिशन घेऊन भारतीय नोटांना नेपाळी चलनात बदलून देत आहेत. भारताच्या आश्वासनावर विश्वास ठेवून दीप कुमार उपाध्याय यांनी नेपाळी लोकांना त्यांनी घाईगर्दीत आपल्याकडील पैशांचे नुकसान करून घेऊ नये, असे आवाहन केले.