रिकामी पाकिटं देऊन भरलेलं पाकिट घ्या; प्लास्टिकमुक्तीसाठी मॅगीची गरमागरम ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 10:19 AM2018-11-15T10:19:23+5:302018-11-15T10:31:22+5:30
जगभरातील वाढत्या प्रदुषणाचा विचार करून पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. अशातच देशातील मोठी फूड कंपनी नेस्ले इंडियाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे.
दिल्ली - जगभरातील वाढत्या प्रदुषणाचा विचार करून पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. अशातच देशातील मोठी फूड कंपनी नेस्ले इंडियाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. मॅगी नूडल्ससाठी विशेष 'रिर्टन स्कीम' सुरू केली आहे. यामध्ये झटपट भूक भागवणारी आणि सर्वांची आवडती असणाऱ्या मॅगीवर स्कीम देण्यात आली आहे. ग्राहकांनी मॅगीची 10 रिकामी पाकिटं दुकानदाराला परत केली तर मॅगीचं एक पाकिट मोफत मिळणार आहे.
'रिर्टन स्कीम' सध्या देहरादून आणि मसूरीमध्ये सुरू असून इतर राज्यात लवकरच लागू करण्यात येणार आहे. नेस्ले इंडियाच्या प्रवक्त्यांना दिलेल्या माहितीनुसार, 250 रिटेलर्स ग्राहकांना ही स्कीम देणार आहेत. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच प्लास्टिकचा कचरा कमी होण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं. तसेच यामुळे नागरिकांमध्येही पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण होईल असा विश्वास नेस्ले इंडियाने व्यक्त केला आहे. नेस्ले इंडियाच्या स्कीममध्ये जमा होणारी रिकामी पाकिटं गोळा करून त्याचं पुढे काय करायचं याची जबाबदारी इंडियन पोल्यूशन कंट्रोल असोसिएशनची असणार आहे.