सहायक प्राध्यापक पदासाठीची 'नेट' परीक्षा लांबणीवर; येत्या 15 जूनपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 07:18 PM2020-06-02T19:18:57+5:302020-06-02T19:29:34+5:30
नियोजित वेळापत्रकानुसार नेट परीक्षा येत्या 15 ते 20 जून या कालावधीत होणार होती..
पुणे: राष्ट्रीय परीक्षा एजन्सीतर्फे (एनटीए) सहायक प्राध्यापक पदासाठी घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेसाठी (नेट) अर्ज करण्यास येत्या 15 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तसेच नियोजित वेळापत्रकानुसार नेट परीक्षा येत्या 15 ते 20 जून या कालावधीत होणार होती.परंतु,येत्या 15 जूनपर्यंत परीक्षा अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचे स्पष्ट होते.
देशभरात ‘एनटीए'तर्फे नेट परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी 31 मे पर्यंत अर्ज करण्यास मुदत देण्यात आली होती. मात्र ,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहिर केलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेक विद्यार्थ्यांना अर्ज करताना अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी मुदतवाढीची मागणी केली होती. एनटीएने मुदतवाढ दिल्याने अर्ज करू न शकलेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यास संधी उपलब्ध झाली आहे.
नेट परीक्षा जून महिन्यात घेण्याचे नियोजन एनटीएने केले होते. मात्र,अर्जासाठी कालावधी वाढविण्यात आल्याने जून महिन्यात परीक्षा होणे शक्य नाही. त्यामुळे नेट परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.