'माझ्या वडिलांच्या अस्थी भारतात आणा', नेताजींच्या कन्येचे भावनिक आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 02:34 PM2022-09-08T14:34:14+5:302022-09-08T14:35:43+5:30
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कन्या अनिता बोस यांनी नेताजींच्या अस्थी जापानमधून भारतात आणण्याचे आवाहन केले आहे.
नवी दिल्ली: नेताजी सुभाषचंद्र बोस यांची कन्या अनिता बोस-फाफ यांनी देशातील सर्व राजकीय पक्षांना टोकियो येथील रेन्कोजी मंदिरातून आपल्या वडिलांच्या अस्थी भारतात आणण्याचे आवाहन केले आहे. तसेच, नवी दिल्लीत नेताजींच्या पुतळ्याचे अनावरण केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले. पंतप्रधान मोदी आज राष्ट्रीय राजधानीतील इंडिया गेट येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 28 फूट उंच पुतळ्याचे अनावरण करणार आहेत.
अनिता बोस-फाफ यांचे भावनिक आवाहन
अर्थशास्त्रज्ञ अनिता बोस-फाफ यांनी जर्मनीहून एक निवेदन जारी केले. त्यात त्या म्हणतात की, "स्वतंत्र भारतात राहण्याची माझ्या वडिलांची इच्छा होती. दुर्दैवाने, त्यांच्या अकाली निधनाने त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. निदान त्यांच्या अस्थिकलशाचा भारताच्या मातीला स्पर्श झाला पाहिजे असे मला वाटते. म्हणून मी भारतातील जनतेला आणि भारतातील सर्व राजकीय पक्षांना आवाहन करते की, माझ्या वडिलांचे अस्थिकलश भारतात आणण्यासाठी सर्प पक्षांनी प्रयत्न करावेत.'
पंतप्रधान मोदींना भेटण्याची इच्छा
अर्थतज्ञ बोस-फाफ म्हणाल्या की, 'माझे वडील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत अनावरण होणार आहे. ही आमच्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाबत आहे.' दरम्यान, या कार्यक्रमाला त्या हजर राहू शकणार नाहीत, अशी माहिती त्यांनी यापूर्वीच दिली होती. तसेच, वडिलांच्या अस्थी भारतात आणण्याबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मोदी नेताजींच्या पुतळ्याचे अनावरण करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी त्यांच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटपर्यंतच्या ड्युटी पथाचे उद्घाटन करणार आहेत. यामध्ये राज्यनिहाय खाद्यपदार्थांचे स्टॉल, लाल ग्रॅनाईट दगडांनी चहुबाजूंनी हिरवेगार रस्ते, वेंडिंग झोन, पार्किंग लॉट्स आणि चोवीस तास सुरक्षा असेल. इंडिया गेट येथील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरणही ते करणार आहेत.