गुमनामी बाबाच होते नेताजी सुभाषचंद्र बोस?
By admin | Published: March 17, 2016 03:31 AM2016-03-17T03:31:10+5:302016-03-17T03:31:10+5:30
उत्तर प्रदेशच्या फैजाबाद जिल्हा कोषागारात असलेल्या गुमनामी बाबांच्या पेटीतून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांचे जुने फोटो सापडल्याने गुमनामी बाबाच प्रत्यक्षात नेताजी
लखनौ : उत्तर प्रदेशच्या फैजाबाद जिल्हा कोषागारात असलेल्या गुमनामी बाबांच्या पेटीतून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांचे जुने फोटो सापडल्याने गुमनामी बाबाच प्रत्यक्षात नेताजी होते काय याबाबतचे गूढ वाढले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गुमनामी बाबांच्या या पेटीत नेताजींचे आई-वडील जानकीनाथ आणि प्रभावती बोस यांचेही छायाचित्र सापडले आहे. गुमनामी बाबा १९८२ ते १९८५ या त्यांच्या अखेरच्या दिवसात रामभवन येथे वास्तव्याला होते. या रामभवनचे मालक शक्तिसिंग यांनी अशी छायाचित्रे मिळाली असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, बोस कुटुंबियांच्या या छायाचित्रात नेताजींच्या आई-वडिलांशिवाय आणखी २२ सदस्य दिसतात. गुमनामी बाबांची ओळख पटविण्यासाठी फैजाबाद जिल्हा प्रशासनाने स्थापन केलेल्या समितीत शक्तिसिंग यांचा खास समावेश करण्यात आला आहे.
शक्तिसिंग यांच्या सांगण्यानुसार नेताजींचे बंधू सुरेशचंद्र बोस यांची मुलगी ललिता हिने ४ फेब्रुवारी १९८६ रोजी रामभवनला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी या छायाचित्रातील सर्व लोकांना ओळखले होते. ललिता बोस यांनी दिलेली माहिती कोषागाराच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)