नेताजी सुभाषचंद्र बोस बंगालमध्ये के के भंडारींच्या नावे करत होते वास्तव्य ?
By admin | Published: May 30, 2016 08:35 AM2016-05-30T08:35:25+5:302016-05-30T08:59:48+5:30
नेताजी सुभाषचंद्र बोस 1960च्या दशकात के के भंडारींच्या नावे शालुमरी आश्रममध्ये वास्तव्य करत होते का ? असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
हैद्राबाद, दि. 30 - नेताजी सुभाषचंद्र बोस 1960च्या दशकात के के भंडारींच्या नावे शालुमरी आश्रममध्ये वास्तव्य करत होते का ? असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे. 27 मे रोजी सुभाषचंद्र बोस यांच्या काही फाईल्स सार्वजनिक करण्यात आल्या होत्या. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
एका फाईलमधील माहितीनुसार 1963मध्ये सरकारमधील उच्च अधिकारी या व्यक्तीबद्दल चर्चा करत होते. सार्वजनिक करण्यात आलेल्या एका फाईलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा उल्लेख वारंवार भंडारी फाईल करण्यात आला आहे. मात्र त्यानंतर कुठेच हा उल्लेख दिसत नाही.
शालुमरी आश्रमाचे सचिव रमानी रंजन दास यांनी 1963मध्ये पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांना सुभाषचंद्र बोस यांच्यासंबंधी एक पत्र पाठवलं होतं. त्यानंतर नेहरुंचे मुख्य खासगी सचिव के राम यांनी तात्काळ गुप्तचर विभागाचे संचालक बी एन मलिक यांना गुप्त मेमो पाठवला होता. 23 मे 1963 रोजी हे पत्र पाठवण्यात आलं होतं. ज्यामध्ये याचा उल्लेख करण्यात आला होता. मलिक यांनी 12 जूनला या मेमोचं उत्तर पाठवलं होतं.
त्याचवर्षी पुन्हा 7 सप्टेंबरला पंतप्रधान कार्यालयाने गुप्त कागदपत्रांमध्ये के के भंडारींचा उल्लेख केला. 11 नोव्हेंबरला पुन्हा हा उल्लेख करण्यात आला. 16 नोव्हेंबरला गुप्तचर खात्याने यावर आपलं उत्तर पाठवलं होतं.
सुभाषचंद्र बोस शालुमरी बाबा नसल्याचा मुखर्जी आयोगाचा निकाल -
जस्टीस मुखर्जी आयोग 1999मध्ये गठीत करण्यात आला होता. सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित फाईल्सच्या प्रती हस्तांतरित करण्यासाठी मुखर्जी आयोगाकडून दबाव टाकण्यात आला होता. मुखर्जी आयोगाकडून टाकण्यात आलेल्या दबावानंतर पंतप्रधान कार्यलयाने फाईल्सना डाऊनग्रेड करत आयोगाला उपलब्ध करुन दिल्या होत्या. 5 जुलै 2000 मध्ये अंतर्गत सचिवांनी (एनजीओ) पाठवलेल्या पत्रात याचा उल्लेख करण्यात आला आहे.
त्यावेळी शालुमरी बाबा नेताजी असल्याच्या बातम्यांमुळे देशभरात सुभाषचंद्र बोस पुन्हा परत आल्याच्या चर्चेला सुरुवात झाली होती. मात्र मुखर्जी आयोगाने नकार देत शालुमरी बाबा नेताजी सुभाषचंद्र बोस नसल्याचं सांगितलं होतं.
उत्तर प्रदेशच्या फैजाबाद जिल्हा कोषागारात असलेल्या गुमनामी बाबांच्या पेटीतून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांचे जुने फोटो सापडल्याने गुमनामी बाबाच प्रत्यक्षात नेताजी होते काय याबाबतचे गूढ वाढले होते. गुमनामी बाबांच्या या पेटीत नेताजींचे आई-वडील जानकीनाथ आणि प्रभावती बोस यांचेही छायाचित्र सापडले होते. गुमनामी बाबा १९८२ ते १९८५ या त्यांच्या अखेरच्या दिवसात रामभवन येथे वास्तव्याला होते. या रामभवनचे मालक शक्तिसिंग यांनी अशी छायाचित्रे मिळाली असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. त्यांनी सांगितले की, बोस कुटुंबियांच्या या छायाचित्रात नेताजींच्या आई-वडिलांशिवाय आणखी २२ सदस्य दिसतात.