भारतीय नोटांवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा फोटो छापणार?; केंद्र सरकारचं लोकसभेत उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 03:28 PM2022-03-21T15:28:53+5:302022-03-21T15:29:12+5:30
भारतीय नोटांवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा फोटो छापण्याचा सरकारचा इरादा आहे का? असा प्रश्न अधिवेशनात विचारण्यात आला.
नवी दिल्ली – भारतीय चलनातील नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो असतो. नरेंद्र मोदी सरकारनं त्यांच्या पहिल्या कारकिर्दीत जुन्या नोटा बदलल्या आणि नवीन नोटा बाजारात आणल्या. मात्र नोटांवरील महात्मा गांधींचा फोटो तसाच ठेवला. अनेकदा नोटांवर अन्य महापुरुषांचे फोटो लावण्याबाबत चर्चा होते. आता त्यात आणखी एक चर्चा सुरू झाली आहे. त्यावर लोकसभेत एका खासदाराने प्रश्न विचारला. तेव्हा केंद्र सरकारनं त्यावर स्पष्टीकरण दिले आहे.
भारतीय नोटांवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा फोटो छापण्याचा सरकारचा इरादा आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासांत खासदार महेंद्र सिंह सोलंकी यांनी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नात म्हटलं होतं की, केंद्र सरकार नोटांवर नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा फोटो छापण्याचं नियोजन करत आहे का? जर असं असेल तर नेताजींचे फोटो असलेल्या नोटा कधी आणि केव्हा येणार? मात्र केंद्र सरकारनं या प्रश्नावर स्पष्ट उत्तर दिले आहे.
केंद्र सरकारकडून अर्थराज्य मंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत या प्रश्नाला उत्तर देताना त्याचे खंडन केले आहे. याबाबत कुठलाही विचार अथवा प्रस्ताव नाही. त्यामुळे अन्य २ प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाही. सरकारच्या या उत्तराने भारतीय नोटांवर महात्मा गांधी यांचा फोटो बदलून अन्य महापुरुषाचा फोटा लावण्याबाबतच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
भारतीय नोटांवर राष्ट्रपितांचा फोटो
भारतीय नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो छापला जातो. आरबीआय(RBI) नुसार, महात्मा गांधी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त पहिल्यांदा महात्मा गांधी यांचा फोटो असलेल्या नोटांची छपाई केली गेली. महात्मा गांधी यांचा फोटो १ रुपये, २ रुपये, ५ रुपये, १० रुपये आणि १०० रुपयांवर छापण्यात आले होते. त्यात गांधीजी सेवाग्राममध्ये बसल्याचं दाखवण्यात आले होते. तर १ रुपयांच्या नोटांवर त्यांचा जवळचा फोटो आहे. १९८७ मध्ये महात्मा गांधी यांचा फोटो असलेला ५०० रुपयांची नोट जारी करण्यात आली होती. ९ ऑक्टोबर २००० रोजी १ हजाराच्या नोटांवर महात्मा गांधी यांचा फोटो आरबीआयकडून छापण्यात आला होता.