नेताजींचा मृत्यू विमान अपघातातच
By admin | Published: June 1, 2017 01:15 AM2017-06-01T01:15:23+5:302017-06-01T01:15:23+5:30
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू १८ आॅगस्ट १९४५ रोजी तैवानमध्ये विमान अपघातामध्येच झाला होता, असे केंद्र सरकारने स्पष्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू १८ आॅगस्ट १९४५ रोजी तैवानमध्ये विमान अपघातामध्येच झाला होता, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. सरकारच्या या उत्तरामुळे नेताजींच्या मृत्यूविषयीचे गूढ संपले आहे, असे अनेकांना वाटत असले तरी मात्र बोस कुटुंबियांनी त्यास आक्षेप घेतला आहे. कोणताही स्पष्ट पुरावा नसताना केंद्र नेताजींच्या मृत्यूचे कारण कसे काय जाहीर करू शकते?, असा सवाल सुभाषचंद्रांच्या भावाच्या नातवाने केला आहे.
गुमनामी बाबा आणि भगवानजी या नावांचा न्या. मुखर्जी आयोगाच्या अहवालात उल्लेख आहे. मात्र बोस हेच त्या नावाने वावरत होते, हे खरे नसल्याचा निष्कर्ष आयोगाने काढला होता, असेही केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. नेताजींचा मृत्यू झालाच नव्हता आणि ते गायब झाल्यानंतर गुमनामी बाबा व भगवानजी या नावाने वावरत होते, असे मानणारा एक वर्ग आहे.
नेताजींच्या भावाची नात माधुरी बोस यांनी मात्र नेताजी असे अन्य नावाने वावरत होते, ही शक्यता फेटाळून लावली आहे. गृह मंत्रालयानेही शाहनवाझ समिती, खोसला आयोग व मुखर्जी आयोग यांच्या अहवालाच्या आधारे त्यांचा मृत्यू विमान अपघातात झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आल्याचे गृह मंत्रालयाने म्हटले आहे. ओपन प्लॅटफॉर्म फॉर नेताजी या संघटनेच्या सायक सेन यांनी माहितीच्या अधिकाराद्वारे सुभाषचंद्र बोस यांच्यासंबंधीची काही माहिती विचारली होती. त्यांच्या अर्जाच्या उत्तरात गृह मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. मात्र सेन यांनी सरकारच्या माहितीमुळे आपणास धक्का बसल्याचे म्हटले आहे. नेताजींच्या मृत्यूचे कारण शोधण्यात यावे, यासाठी आम्ही झगडत आहोत, विमान अपघाताबाबत निश्चित पुरावा अद्याप सापडलेला नाही. असे असताना कशाच्या आधारे हे उत्तर सरकारने दिले, असा सवाल नेताजींच्या भावाचे नातू व बंगाल भाजपचे उपाध्यक्ष विमान बोस यांनीही केला आहे.
मोदींनी दिले होते तपासाचे आश्वासन
मी आधी नेताजींचा नातू आहे आणि मग भाजपचा उपाध्यक्ष, असे सांगून विमान बोस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजींच्या संबंधीच्या फायली उघड केल्या. त्यावेळी त्यांनी नेताजींविषयीचे गूढ दूर करण्यासाठी त्या प्रकरणाचा तपास करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.
नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाला नव्हता आणि ते चीन वा रशियाला गेले, असे मुखर्जी आयोगाच्या अहवालात स्पष्टपणे म्हटले होते.
मात्र तेव्हाच्या सरकारने तो निष्कर्ष फेटाळून लावला होता. नेताजी बोस यांचा मृत्यू विमान अपघातात झालाच नव्हता, असे काही संशोधकांचेही म्हणणे आहे.