प्रेमासाठी काय पण! नेदरलँडच्या तरुणीचा यूपीच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 04:26 PM2023-11-30T16:26:57+5:302023-11-30T16:34:32+5:30
हार्दिक वर्माची भेट नेदरलँडच्या बार्नेवेल्ड शहरात राहणाऱ्या गॅबरिला डुडाशी झाली. भेटीनंतर प्रेम फुललं.
नेदरलँडची तरुणी भारताची सून झाली आहे. प्रियकरासाठी ती सातासमुद्रापार आली. 25 नोव्हेंबरला तरुणी फतेहपूरला पोहोचली. यानंतर कुटुंबीयांच्या उपस्थितीत दोघांचा विवाह संपन्न झाला. या हटके लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. लालौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दातौली गावात नेदरलँडची मुलगी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तरुणीचा पासपोर्ट आणि इतर कागदपत्रांची तपासणी केली.
राधेलाल वर्मा यांना निशांत वर्मा आणि हार्दिक वर्मा अशी दोन मुलं आहेत. हार्दिक वर्मा 8 वर्षांपूर्वी नोकरीसाठी नेदरलँडला गेला होता. एका औषधांच्या कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करू लागला. कंपनीत काम करत असताना, हार्दिक वर्माची भेट नेदरलँडच्या बार्नेवेल्ड शहरात राहणाऱ्या गॅबरिला डुडाशी झाली. भेटीनंतर प्रेम फुललं. दोघांनीही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला.
दोन वर्षे एकत्र राहिल्यानंतर भारतीय बॉयफ्रेंड आणि परदेशी गर्लफ्रेंड गॅबरिला डुडा यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ती 15 दिवसांपूर्वी तिच्या प्रियकरासोबत भारतात आली होती. घरी पोहोचल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी एंगेजमेंट केली. हार्दिक वर्माचे वडील राधेलाल वर्मा गेल्या 40 वर्षांपासून गुजरात राज्यातील गांधीनगरमध्ये राहतात.
25 नोव्हेंबर रोजी राधेलाल यांचं कुटुंब गॅबरिला डुडासोबत त्यांच्या मूळ गावी परतले. 26 नोव्हेंबर रोजी कुटुंबीयांच्या उपस्थितीत हळदीचा समारंभ पार पडला. त्यानंतर दोघांचं लग्न झालं. दतौली गावात परदेशी तरुणी आल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. माहिती मिळताच दतौली पोलीस तपासासाठी दाखल झाले.
विवाह सोहळा पार पडला असल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं. नेदरलँडला पोहोचल्यानंतर दोघेही कोर्ट मॅरेज करणार आहेत. सकाळी लग्नाची माहिती मिळताच दत्तौली पोलीस तपासासाठी दाखल झाले. तरुणाला पोलीस ठाण्यात बोलावून परदेशी तरुणीच्या पासपोर्टसह महत्त्वाची कागदपत्रे तपासण्यात आली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.