भाजपा जाहीरनाम्यात नोटाबंदी, जीएसटी, रोजगाराची उपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 06:20 AM2019-04-09T06:20:03+5:302019-04-09T06:20:22+5:30
चौकीदार, प्रधानसेवक शब्द गायब; पक्षापेक्षा मोदीच ठरले वरचढ !
- प्रेमदास राठोड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने सोमवारी जारी केलेल्या जाहीरनाम्यात नोटाबंदी, जीएसटी, रोजगार या गोष्टींना जवळपास फाटा दिला आहे. चौकीदार व प्रधानसेवक हे चर्चेतले दोन्ही शब्द भाजपाच्या जाहीरनाम्यात कुठेही स्थान मिळवू शकले नाहीत. जाहीरनाम्यात पक्षापेक्षा मोदीच वरचढ ठरले आहेत. त्यात मोदींचा उल्लेख ३२ ठिकाणी तर भाजपचा उल्लेख फक्त २० ठिकाणी आहे. याउलट काँग्रेसच्या जाहीरनाम्यात ३० ठिकाणी भाजपचा उल्लेख होता. राहुल गांधी यांचा उल्लेख फक्त ४ ठिकाणी तर काँग्रेसचा उल्लेख तब्बल ४०२ ठिकाणी होता.
काँग्रेसचा २ एप्रिल रोजी जारी केलेला जाहीरनामा ५६ पानांचा तर भाजपाने प्रसिद्ध केलेला जाहीरनामा ४५ पानांचा आहे. मोदी सरकारने नोटाबंदीचा मोठा गाजावाजा केला होता. पण जाहीरनाम्यात फक्त एकाच ठिकाणी नोटाबंदीचा ओझरता उल्लेख आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नोटाबंदीचा उल्लेख चार ठिकाणी आहे. केंद्रात सत्तेत आल्यापासून जीएसटी हा मोदींसाठी जिव्हाळ्याचा विषय. पण जाहीरनाम्यात फक्त १० ठिकाणी जीएसटीचा उल्लेख आहे. काँग्रेसने २३ ठिकाणी जीएसटीची दखल घेतली आहे. नोकरीच्या मुद्द्याचीही भाजपाने उपेक्षा केली आहे. नोकरी शब्दाचा उल्लेख भाजप जाहीरनाम्यात फक्त ३ ठिकाणी तर काँग्रेस जाहीरनाम्यात ३३ ठिकाणी आहे. भाजप जाहीरनाम्यात आरटीआय शब्द नाही, काँग्रेसने ५१ ठिकाणी आरटीआयची दखल घेतली आहे.
भाजपच्या जाहीरनाम्यात एनडीएचा उल्लेख तिनदा व यूपीएचा उल्लेख ८ वेळा आहे. काँग्रेसने एनडीएचा उल्लेख तीनदा व यूपीएचा उल्लेख १० वेळा आहे. आयात व निर्यात दोन महत्त्वाचे शब्द भाजप जाहीरनाम्यातून गायब आहे. काँग्रेसने १८ ठिकाणी निर्यात व २१ ठिकाणी आयातीचा उल्लेख केला आहे. हेल्थ शब्दाची भाजपाने २३ ठिकाणी तर काँग्रेसने ४७ ठिकाणी दखल घेतली आहे. शाळा व शिक्षण शब्दांच्या नोंदीतही काँग्रेसने भाजपवर मात केली आहे. भाजप जाहीरनाम्यात शाळा शब्द १५ वेळा तर काँग्रेसने २८ वेळा आला आहे. शिक्षण शब्द भाजपकडे ३६ ठिकाणी तर काँग्रेसकडे ५० ठिकाणी आहे. एम्प्लॉयमेंट शब्द भाजप जाहीरनाम्यात १२ ठिकाणी काँग्रेसकडे २४ ठिकाणी आहे. रिक्त जागांचा (व्हेकॅन्सीज) उल्लेख भाजप जाहीरनाम्यात कुठेही नाही. काँग्रेसने त्याची ११ ठिकाणी दखल घेतली आहे. जीडीपीचा उल्लेख भाजप ७ ठिकाणी आणि काँग्रेसने १८ ठिकाणी केला आहे. सीनिअर सिटिझन्सचा उल्लेख भाजपने एकदा व काँग्रेसने ९ वेळा केला आहे.
कृषी, मत्स्यव्यवसाय, इकॉनॉमी, इंडस्ट्री, मनरेगा, सायन्स, पीक, पाकिस्तान, अंतर्गत सुरक्षा, संरक्षण, बॉर्डर या शब्दांच्या उल्लेखातही काँग्रेसने भाजपला मागे टाकले आहे. भाजपने इंडिया शब्द ११७ ठिकाणी तर भारत शब्दाचा उल्लेख ३१ ठिकाणी केला आहे. सर्जिकल स्ट्राइक व एअर स्ट्राइकची भाजपाने दोन-दोन ठिकाणी नोंद घेतली आहे, पण सीआरपीएफ, आर्मी यांचा उल्लेख कुठेही दिसत नाही.
वाजपेयी यांची एकाच ठिकाणी दखल
भाजपने वाजपेयी यांची एकाच ठिकाणी दखल घेतली आहे. काँग्रेसने इंदिरा गांधी व राजीव गांधी यांचे प्रत्येकी तीनदा उल्लेख केले आहेत. भाजपने अमित शहा व महात्मा गांधी यांची प्रत्येकी दोनदा नोंद घेतली आहे. काँग्रेसने मात्र तीनवेळा महात्मा गांधींचा उल्लेख केला आहे.