पंतप्रधान मोदी भेटीसंबंधी सुप्रिया सुळेंच्या खुलाशामुळे शिवसेनेचा दावा ठरला खोटा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2017 01:53 PM2017-09-11T13:53:49+5:302017-09-11T13:59:18+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवारांमध्ये भेट झाली त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे तिथे उपस्थित होत्या.
नवी दिल्ली, दि. 11 - केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेररचनेआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना कधीही भेटलो नाही असा खुलासा सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या आहेत. एनडीटीव्ही वृत्तवाहिनीकडे सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवारांमध्ये भेट झाली त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे तिथे उपस्थित होत्या. पंतप्रधान मोदींनी सुप्रिया सुळे यांना मंत्रिपदाची ऑफर दिली होती असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या लेखात केला होता. शरद पवारांनीच आपल्याला ही माहिती दिली असे संजय राऊत यांचे म्हणणे आहे.
रविवारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शताब्दीवर्ष सांगता सोहळयाला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार आणि सुप्रिया सुळे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. त्याचदिवशी हा लेख प्रसिद्ध झाला. त्यामुळे राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेस-भाजपा एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्या.
काय म्हटले आहे संजय राऊत यांनी
महाराष्ट्राचे बलदंड नेते श्री. शरद पवार यांच्याशी भेट झाली. देशाच्या राजकारणावर चर्चा झाली. ‘‘आपण भारतीय जनता पक्षाच्या गळाला लागला आहात. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात शरद पवारांना स्थान असल्याच्या बातम्या जोरात होत्या, हे कसे?’’ यावर श्री. पवार म्हणाले, ‘‘हे कसे शक्य आहे? त्या बातम्या म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे.’’
‘‘मग तुमच्या किंवा राष्ट्रवादी काँगेसच्या बाबतीत बातम्या का येतात?’’
‘‘या अफवा ठरवून पसरवल्या जातात. एकदा श्री. मोदी मला म्हणाले, माझ्या मंत्रिमंडळात मला सुप्रिया हवी आहे. सुप्रिया तेव्हा माझ्याबरोबरच होती. तिने मोदी यांना तोंडावर सांगितले, भारतीय जनता पक्षात जाणारी मी शेवटची व्यक्ती असेन. आमच्या भूमिका स्पष्ट आहेत, पण गोंधळ उडविण्यासाठी अशा बातम्या पसरविल्या जातात.’’
शिवसेनेकडून सातत्याने केंद्र आणि राज्यातल्या भाजपाच्या नेतृत्वावर आगपाखड सुरु असते. शिवसेना सत्तेत सहभागी असली तरी त्यांना अपेक्षित वाटा न मिळाल्याने शिवसेनेमध्ये नाराजी आहे. उद्या शिवसेनेने पाठिंबा काढलाच तर, राज्यातील सरकार अडचणीत येऊ शकते. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीची तजवीज करुन ठेवण्याचा भाजपाचा प्रयत्न असावा.