ललित मोदींसाठी कधीच शिफारस केली नाही - सुषमा स्वराज
By admin | Published: August 3, 2015 11:46 AM2015-08-03T11:46:09+5:302015-08-03T14:24:40+5:30
ललित मोदींच्या ट्रॅव्हल डॉक्यूमेंटसाठी ब्रिटन सरकारला कधीही शिफारस केलेली नाही असा दावा करत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्वतःवरील आरोप फेटाळून लावले आहेत.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - ललित मोदींच्या ट्रॅव्हल डॉक्यूमेंटसाठी ब्रिटन सरकारला कधीही शिफारस केलेली नाही असा दावा करत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्वतःवरील आरोप फेटाळून लावले आहेत. काँग्रेस सादर करत असलेल्या पुराव्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सोमवारी राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधकांनी सुरुवातीला नो वर्क नो पे या धोरणावरुन गदारोळ घातला. केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी खासदारांसाठी नो वर्क नो पे हे धोरण सुरु करण्याचे विधान केले होते. यावरुन काही वेळ गोंधळ घातल्यावर विरोधकांनी ललित मोदी प्रकरणावरुन सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. विरोधकांच्या आरोपावर सुषमा स्वराज यांनी पहिल्यांदाच राज्यसभेत उत्तर दिले. स्वराज म्हणाल्या, माझ्यावरील आरोप निराधार आहेत, मी ललित मोदींना कधीही मदत केली नाही. मी आरोपांवर उत्तर देण्यासाठी दररोज संसदेत येते, पण विरोधक माझे उत्तर ऐकून घेण्याऐवजी फक्त गोंधळ घालत आहेत अशी टीका त्यांनी केली. सुषणा स्वराज उत्तर देत असताना विरोधकांनी राज्यसभा अध्यक्षांसमोर येऊन जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे राज्यसभेचे कामकाज तहकूब करावे लागले.