नवा वाद : भाजप, लोजपाला वगळून नितीशकुमारांनी केला मंत्रिमंडळ विस्तार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 03:03 AM2019-06-03T03:03:47+5:302019-06-03T03:04:08+5:30
आठही मंत्री जदयूचे : केंद्रातील अवमानाचा वचपा काढल्याची चर्चा
एस. पी. सिन्हा
पाटणा : भाजप, लोक जनशक्ती पार्टी (लोजपा) या मित्रपक्षांना वगळून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी रविवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला. मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेले आठही मंत्री जनता दल (यू)चे आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळ बनविताना मोदी सरकारने केलेल्या अपमानाचा जनता दल (यू)ने बिहारमध्ये अशा प्रकारे वचपा काढल्याची चर्चा आहे.
नितीशकुमार यांनी पत्रकारांना सांगितले की, राज्य मंत्रिमंडळात भाजपला एक जागा देऊ केली होती. या गोष्टीला दुजोरा देत बिहारचे उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी म्हणाले की, ही जागा नंतर भरण्याचे भाजपने ठरविले आहे.
नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात जनता दल (यू)ला एक मंत्रीपद देण्यात आले होते. मात्र संसदेत आमच्या पक्षाचे जितके सदस्य आहेत त्या तुलनेत मंत्रीपदे मिळाली पाहिजेत, अशी नितीशकुमार यांनी केलेली मागणी भाजपने मान्य केली नाही. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय जनता दल (यू)ने घेतला होता. मात्र मोदींच्या व त्यांच्या मंत्र्यांच्या शपथविधीस नितीशकुमार हजर राहिले.
बिहारमध्ये जनता दल (यू) व भाजपचे आघाडी सरकार आहे. लोकसभा निवडणुकांत राज्यातील ४० पैकी भाजपने १७ व जनता दल (यू)ने १६ जागा जिंकल्या आहेत. मोदींच्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या कारकिर्दीतही जनता दल (यू) केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाला नव्हता.
कोणतेही मतभेद नाहीत, सर्व काही आलबेल
येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप-जदयूमध्ये फूट पडेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. लोकसभा निवडणुकीत जास्त जागा मिळूनही मंत्रिमंडळात योग्य तो सन्मान न मिळाल्याने जदयूमध्ये नाराजी असल्याचे काही नेत्यांचे म्हणणे आहे.
नितीशकुमार यांनी म्हटले की, भाजपसोबत सर्व काही आलबेल आहे. भाजप नेता आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनीही एनडीएमध्ये २०० टक्के ठीकठाक असल्याचा दावा केला आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरून कोणताही वाद नाही. भाजप मंत्र्यांना विस्तारात समाविष्ट करण्याचे पक्ष नेतृत्वाने सध्या टाळले, असे टिष्ट्वट केले.
जातीपातीच्या गणितांचा विचार
जातीपातीची गणिते लक्षात ठेवून बिहार मंत्रिमंडळाच्या विस्तारात मागासवर्गीय, उच्चवर्गीय, आर्थिकदृष्ट्या मागासलेले, दलित या वर्गांना प्रत्येकी दोन पदे दिली आहेत. २०२० साली होणाऱ्या राज्य विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. राज्यपाल लालजी टंडन यांनी नव्या आठ मंत्र्यांना रविवारी शपथ दिली. नितीशकुमार यांनी सत्तेवर आल्यानंतर केलेला हा दुसरा विस्तार आहे.