New CDS Appointment: मोठी बातमी! लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 07:03 PM2022-09-28T19:03:43+5:302022-09-28T19:18:41+5:30
भारताचे पहिले CDS जनरल बिपिन रावत यांच्या निधनानंतर, अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या या पदावरील नियुक्ती अखेर झाली आहे.
New CDS Appointment: भारताचे पहिले CDS जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या या पदावरील नव्या नियुक्तीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) (Lt General Anil Chauhan) यांची भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली.
Govt of India appoints Lt General Anil Chauhan (Retired) as the next Chief of Defence Staff (CDS) who will also function as Secretary to Government of India, Department of Military Affairs: MoD pic.twitter.com/Ohg156uwTx
— ANI (@ANI) September 28, 2022
देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे गेल्या वर्षी 8 डिसेंबर रोजी हेलिकॉप्टर अपघातामध्ये निधन झाले होते. रावत यांच्यासोबत त्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्या त्यांच्या पत्नी आणि इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही या भीषण दुर्घटनेत मृत्यू झाला होता. दरम्यान, बिपिन रावत यांच्या मृत्यूनंतर रिक्त असलेले CDS पद कोणाकडे जाणार, याची अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. याबाबत अनेक अधिकाऱ्यांची नावेही पुढे आली होती. पण, आज अखेर केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांची CDS म्हणून नियुक्ती केली आहे.
अनिल चौहान यांचा अल्प परिचय
लेफ्टनंट जनरल अनिल चौहान हे भारतीय लष्करातील निवृत्त अधिकारी आहेत. त्यांना भारतीय लष्कराचा सूमारे 40 वर्षांचा अनुभव आहे. आपल्या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत अनिल चौहान यांनी अनेक प्रमुख पदांवर काम केले आहे. विशेष म्हणजे, जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातील कारवायांबाबत त्यांना मोठी माहिती आहे. त्यांच्या याच अनुभवामुळे त्यांची सीडीएसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
CDS होण्यासाठी कोणते निकष असतात?
सरकारने लष्कर, नौदल आणि हवाई दल सेवा कायद्यात बदल केले असून त्याची अधिसूचना काही महिन्यांपूर्वी जारी करण्यात आली. अधिसूचनेमध्ये म्हटले की, सार्वजनिक हितासाठी, लेफ्टनंट जनरल किंवा जनरल किंवा त्याच्या समकक्ष किंवा सेवारत लेफ्टनंट जनरल किंवा जनरल या रँकचा सेवानिवृत्त अधिकारी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्त केला जाऊ शकतो. थ्री स्टार जनरल्स म्हणजे लष्करातील लेफ्टनंट जनरल, वायुसेनेतील एअर मार्शल आणि नौदलातील व्हाईस अॅडमिरल वयाच्या 60 व्या वर्षी निवृत्त होतात. त्यामुळे दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत निवृत्त झालेल्या कोणत्याही तीन स्टार जनरलचाही सीडीएस होण्याच्या शर्यतीत विचार केला जाऊ शकतो.
सीडीएस पदाची मागणी केव्हा करण्यात आली?
कारगिल युद्धादरम्यान लष्कर, हवाई दल आणि नौदल यांच्यातील समन्वयाचा अभाव निदर्शनास आला होता. 1999 मध्ये कारगिल युद्धातील विजयानंतर तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकारने एक समीक्षा समिती स्थापन केली होती. तिन्ही सेवांमधील समन्वयाचा अभाव दूर करण्यासाठी समितीने सूचना केल्या होत्या. समितीने तिन्ही सेवांमध्ये समन्वयासाठी एक पद निर्माण करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर, नरेंद्र मोदी सरकारने 24 डिसेंबर 2019 रोजी CDS पदाची घोषणा केली आणि जनरल बिपिन रावत हे देशातील पहिले CDS बनले.
CDS ला कोणते अधिकार आहेत?
CDS हे भारतीय सशस्त्र दलाच्या चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे लष्करी प्रमुख आहेत. हा भारतीय लष्करातील सर्वोच्च दर्जाचा अधिकारी आहे. CDS हे संरक्षण मंत्रालयाचे मुख्य लष्करी सल्लागार आहेत. हे अधिकारी पंतप्रधानांचे लष्करी सल्लागारही आहेत. सीडीएस हे लष्करी व्यवहार विभागाचे प्रमुख देखील आहेत. सीडीएस तीन सेवांमध्ये समन्वय म्हणून काम करतात. समन्वयामुळे, आपत्कालीन परिस्थितीत तिन्ही सैन्यांचा चांगला संपर्क होऊ शकतो. सीडीएस न्यूक्लियर कमांड अथॉरिटीचे लष्करी सल्लागार म्हणूनही काम करतात.