मद्यपींना खर्चाची किक बसण्याची शक्यता; दारुवर 'काऊ सेस' लागणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2018 04:39 PM2018-06-08T16:39:37+5:302018-06-08T16:49:44+5:30
दारुवर अधिभार लावण्याचा प्रस्ताव विचाराधीन
जयपूर: गायींच्या सुरक्षेसाठी महसूल गोळा करण्यासाठी राजस्थान सरकार दारुवर 'काऊ सेस' लावण्याच्या विचारात आहे. त्यामुळे मद्यपींना खर्चाची किक बसणार आहे. गोसंरक्षण आणि गोसंवर्धनासाठी दारुवर अधिभार लावण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे दारु आणखी महाग होईल.
गायींच्या सुरक्षेसाठी स्टॅम्प ड्युटीवरील अधिभार दुप्पट करण्याचा विचार राजस्थान सरकारनं सुरू केला आहे. हा प्रस्ताव विचाराधीन असताना आता दारुवरही काऊ सेस लावण्याचा नवा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. राजस्थानात या वर्षाच्या अखेरीस विधानसभेची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर स्टॅम्प ड्युटी आणि दारुवर अधिभार लावण्याचा निर्णय सरकारसाठी डोकेदुखी ठरु शकतो.
स्टॅम्प ड्युटी आणि दारुवर अधिभार लावण्याच्या प्रस्तावावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री वसुंधरा राजे घेणार आहेत. दारुच्या प्रकारावरुन अधिभार किती लावण्यात येणार येईल, याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सरकारमधील सूत्रांनी दिली. यामुळे मद्यपींच्या खर्चात वाढ होईल, असंही सूत्रांनी सांगितलं. मात्र अद्याप या प्रस्तावावर अंतिम निर्णय व्हायचा आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यातही मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी भाडे कराराशी संबंधित कागदपत्रांवर 10 टक्के अधिभार लावण्याचा निर्णय घेतला होता. यामधून मिळणारा महसूल गायींच्या संरक्षणासाठी वापरण्यात येणार असल्याचं त्यावेळी सरकारनं सांगितलं होतं.