अमेरिकेसोबत नवा अध्याय सुरू होईल

By admin | Published: September 26, 2014 05:04 AM2014-09-26T05:04:20+5:302014-09-26T05:04:20+5:30

अमेरिका हा भारताचा महत्त्वपूर्ण भागीदार देश असून या देशाच्या दौऱ्यामुळे दुरावा बऱ्याच प्रमाणात संपुष्टात आणण्यात मदत होईल

New chapter begins with US | अमेरिकेसोबत नवा अध्याय सुरू होईल

अमेरिकेसोबत नवा अध्याय सुरू होईल

Next

नवी दिल्ली : अमेरिका हा भारताचा महत्त्वपूर्ण भागीदार देश असून या देशाच्या दौऱ्यामुळे दुरावा बऱ्याच प्रमाणात संपुष्टात आणण्यात मदत होईल, व्यूहरचनात्मक संबंधात नवा अध्याय सुरू होईल, अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी गुरुवारी पाच दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी दिलेल्या निवेदनात या भेटीचा उद्देश स्पष्ट केला.
द्विपक्षीय, तसेच वैश्विक हिताच्या दृष्टिकोनातून दोन देशांचे संबंध नव्या उंचीवर कसे नेता येतील, याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबतच्या चर्चेत भर दिला जाईल. ओबामा यांचा जीवनप्रवास लोकशाही व्यवस्थेत सर्वसामान्यांना उपलब्ध झालेले अधिकार आणि संधीचे उल्लेखनीय असे उदाहरण ठरते. जगभरातील लोकांसाठी त्यांचे आयुष्य प्रेरणादायी आहे, असे मोदींनी ओबामा यांची प्रशंसा करताना म्हटले.
भारताच्या राष्ट्रीय विकासासाठी मी अमेरिकेकडे महत्त्वपूर्ण भागीदार म्हणून बघतो. दोन देशांदरम्यान शिक्षण, कौशल्य विकास, संशोधन, तंत्रज्ञान आणि नवप्रक्रियेत भागीदारीच्या अधिकाधिक शक्यता आहेत. त्याहीपेक्षा दोन देश मानवी मूल्य जपण्यासाठी कटिबद्ध आहेत, असे ते म्हणाले. मोदी शनिवारी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्राच्या ६९ व्या महाअधिवेशनाला संबोधित करतील. जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदी, जगाच्या अनेक भागात असलेला तणाव आणि संकट, दहशतवादी कारवायांमध्ये वाढ आणि विस्तार, आफ्रिकेतील इबोला विषाणूंचे संकट, वातावरण बदल, तसेच दारिद्र्य निर्मूलनासाठी जागतिक कटिबद्धता आणि अधिक समन्वयासोबत बहुआयामी कृतीवर भाषणात भर देणार असल्याचे त्यांनी नमूद केले. २०१५ नंतरच्या काळासाठी वृद्धी, विकास आणि दारिद्र्य निर्मूलनावर लक्ष केंद्रित करणारा जागतिक विकासाचा अजेंडा त्वरित स्वीकारला जावा, असे आवाहनही मोदी करणार आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: New chapter begins with US

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.