भारतरत्न पुरस्कारावरून नवे वादंग; मोदी सरकारला लक्ष्य करत मायावतींनी केली ही मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 05:30 PM2024-02-09T17:30:26+5:302024-02-09T17:33:01+5:30

भारतरत्न पुरस्काराबाबत दलित व्यक्तींची उपेक्षा करणं अजिबात योग्य नाही, असं मायावती यांनी म्हटलं आहे.

New Controversy over Bharat Ratna Award Mayawati made this demand targeting the Modi government | भारतरत्न पुरस्कारावरून नवे वादंग; मोदी सरकारला लक्ष्य करत मायावतींनी केली ही मागणी

भारतरत्न पुरस्कारावरून नवे वादंग; मोदी सरकारला लक्ष्य करत मायावतींनी केली ही मागणी

Mayawati On Bharat Ratna Award ( Marathi News ) : केंद्र सरकारकडून कर्पुरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यानंतर आज देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आणि  पीव्ही नरसिंह राव यांच्यासह ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ डॉ. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतची घोषणा करताच देशभरातील विविध राजकीय नेत्यांनी आनंद व्यक्त करत सरकारचे आभार मानले आहेत. मात्र या निवडीनंतर नवं वादंगही निर्माण झालं असून उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी सरकारकडे नवी मागणी केली आहे.

केंद्र सरकारने आणखी तीन व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराची घोषणा करताच मायावती यांनी म्हटलं आहे की, "केंद्रातील विद्यमान भाजप सरकारकडून ज्या व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय, त्याबद्दल मी सरकारचं स्वागत करते. मात्र या पुरस्काराबाबत दलित व्यक्तींची उपेक्षा करणं अजिबात योग्य नाही. सरकारने याकडेही लक्ष द्यायला हवं," अशी मागणी मायावती यांनी केली आहे.

भारतरत्न पुरस्कारावरून सरकारला लक्ष्य करताना मायावती पुढे म्हणाल्या की, " डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मोठ्या प्रतिक्षेनंतर व्ही. पी. सिंह यांच्या सरकारने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं होतं. त्यानंतर दलित आणि उपेक्षितांचे तारणहार श्री कांशीराम यांनी केलेला संघर्षही काही कमी नाही. त्यांनाही लवकरात लवकर भारतरत्न पुरस्कार मिळायला हवा," अशी अपेक्षा मायावती यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारने भारतरत्न पुरस्काराबाबत आधीचे सर्व विक्रम मोडीत काढत गेल्या १५ दिवसांतच तब्बल पाच  व्यक्तींना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. हा सन्मान मिळवणाऱ्यांमध्ये २ माजी पंतप्रधान, १ माजी उपपंतप्रधान, १ मुख्यमंत्री तसेच प्रसिद्ध कृषीतज्ज्ञांचा समावेश आहे. यातील चौघांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात येत आहे. या पाच नावांची घोषणा स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

Web Title: New Controversy over Bharat Ratna Award Mayawati made this demand targeting the Modi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.