'स्वाक्षरी' केलेला तिरंगा भेट दिल्याने मोदींच्या दौ-यात नवा वाद
By admin | Published: September 25, 2015 01:21 PM2015-09-25T13:21:20+5:302015-09-25T15:24:46+5:30
अमेरिकेच्या दौ-यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूयॉर्कमध्ये सेलिब्रिटी शेफ विकास खन्नाला स्वाक्षरी केलेला तिरंगा झेंडा भेट दिल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे..
Next
ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. २५ - अमेरिकेच्या दौ-यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूयॉर्कमध्ये सेलिब्रिटी शेफ विकास खन्नाला स्वाक्षरी केलेला तिरंगा झेंडा भेट दिल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. यावरुन चोहोबाजूंनी टीका सुरु झाल्यावर परराष्ट्र मंत्रालयाने विकासकडून हा तिरंगा परत घेतला आहे.
प्रथितयश ‘फॉर्च्युन ५००’ कंपन्यांपैकी ४७ कंपन्यांचे सीईओ व अध्यक्षांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी न्यूयॉर्कमध्ये भेट घेतली. त्यादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या डिनरसाठी सेलिब्रिटी शेफ विकास खन्नाने खास जेवण बनवले होते. त्यानंतर मोदींनी विकासची भेट घेऊन त्याचे कौतुक केले व स्वाक्षरी केलेला तिरंगा त्याला भेट दिला. विकास हा तिरंगा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडे सूपूर्त करणार होता. मात्र भारतीय संविधानानुसार राष्ट्रीय तिरंग्यावर काहीही लिहीण्यास अथवा रंगरंगोटी करण्यास मनाई असल्याने मोदींची ही कृती वादाच्या भोव-यात सापडली आहे. विकासकडून हा 'स्वाक्षरी' केलेला तिरंगा परत घेण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयातील अधिका-यांनी दिली.
भारतात प्रशासकीय सुधारणांना सर्वोच्च प्राधान्य - मोदी
प्रथितयश ‘फॉर्च्युन ५००’ कंपन्यांपैकी ४७ कंपन्यांचे सीईओ व अध्यक्षांसोबत काल झालेल्या बैठकीत मोदींनी त्यांना 'मेक इन इंडिया'चे आवाहन केले. भारतात प्रशासकीय सुधारणांना आपले सर्वोच्च प्राधान्य असेल, असे त्यांनी या बैठकीत सांगितले. 'विविध मंजुऱी प्रक्रिया आम्ही अत्यंत सुलभ व सुटसुटीत केले असून निर्णय प्रक्रियाही वेगवान व पारदर्शक झाल्याचा दावा' मोदींनी केला. या कार्यक्रमास पेप्सिकोच्या इंद्रा नुयी, फोर्डचे अध्यक्ष मार्क फिल्ड, डाऊ केमिकल्सचे अध्यक्ष अॅंड्र्यू लिव्हेरिस, लॉकहिड मार्टिनचे अध्यक्ष व सीईओ मार्लिन ह्युसन यांच्यासह अनेक महत्वाच्या कंपन्यांचे सीईओ उपस्थित होते.