CoronaVirus News: कोरोनाची ३ नवी लक्षणं आढळली; 'हा' त्रास झाल्यास असू शकतो धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 11:52 AM2020-07-01T11:52:03+5:302020-07-01T11:57:43+5:30
कोरोनाची तीन नवी लक्षणं आढळली
मुंबई: जगातील कोरोनाबाधितांची संख्या १ कोटीच्या पुढे गेली असून मृतांचा आकडा ५ लाखांहून जास्त आहे. दिवसागणिक कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यातच आता कोरोनाची आणखी तीन लक्षणं आढळून आली आहेत. कोरोनाची बाधा झाल्यास सर्दी, उलट्या, अतिसाराचा त्रास होतो. मात्र यात आणखी तीन लक्षणांची भर पडली आहे.
कंबरदुखीदेखील कोरोनाचं लक्षण असल्याची माहिती आता समोर आली आहे. याशिवाय पोटदुखी, पोटऱ्यांमधील वेदना हीदेखील कोरोनाची लक्षणं असू शकतात, अशी माहिती मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर जलील पारकर यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून पारकर कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांवर उपचार करत आहेत. त्यांनी जवळपास २०० रुग्णांवर उपचार केले. त्यानंतर त्यांनाही कोरोनाची लागण झाली. कोरोना रुग्णांवर उपचार करताना बऱ्याचशा प्रकरणांमध्ये पाठदुखीचा त्रास होत असल्याची तक्रार रुग्णांनी केल्याचं पारकर यांनी सांगितलं.
आतापर्यंत कोरोनाची ९ लक्षणं आढळून आली आहेत. त्यात आता अमेरिकन सेंटर फॉर डिजीज कंट्रोलनं तीन नव्या लक्षणांचा समावेश केला आहे. त्यात नाक गळणं, पोटात ढवळणं, उलट्या यांचा समावेश आहे. याआधी कोरोनाची ९ लक्षणं आढळून आली आहेत. त्यात ताप, सुका खोकला, श्वासोच्छवासात अडचणी, थकवा, अंगदुखी, डोकेदुखी, तोंडाची चव जाणं, घशात खवखव यांचा समावेश आहे.
मधुमेह, रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तींना कोरोनाचा अधिक धोका असल्याची माहिती आधीच समोर आली आहे. मात्र आता अनेकांच्या शरीरातील साखरेचं प्रमाण अचानक वाढू लागल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास येऊ लागलं आहे. आतापर्यंत कधीही मधुमेहाचा त्रास न झालेल्या अनेक व्यक्तींच्या शरीरातील साखरेचं प्रमाण ४०० च्या पुढे गेलं आहे. कोरोनाची लागण झालेल्या अनेकांच्या शरीरातील साखरेचं प्रमाण वाढल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
पावसाळ्यात विषाणूंच्या संक्रमणापासून बचावासाठी आयुष मंत्रालयाने सांगितले 'हे' सोपे उपाय
संतापजनक! मास्क लावण्याचा सल्ला दिला म्हणून कार्यालयातील दिव्यांग महिलेला बेदम मारहाण