उमा भारतींवर नवे संकट
By admin | Published: April 20, 2017 12:54 AM2017-04-20T00:54:31+5:302017-04-20T00:54:31+5:30
बाबरी प्रकरणात न्यायालयाच्या निकालानंतर केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्या भवितव्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
हरीश गुप्ता, नवी दिल्ली
बाबरी प्रकरणात न्यायालयाच्या निकालानंतर केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्या भवितव्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. न्यायालयाने लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती आणि इतर १२ जणांवर गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचल्याचा खटला चालवण्यास परवानगी दिल्यानंतर ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची घाईघाईने बुधवारी सायंकाळी बैठक झाली. तिला पक्षाध्यक्ष अमित शाह व वरिष्ठ मंत्री उपस्थित होते. काश्मीर प्रश्नाशी सरकार झगडत असताना देशातील धार्मिक शांतता आणि सलोखा बिघडू नये, असेच सरकारला वाटत आहे.
न्यायालयाच्या निर्णयावर अडवाणी वा जोशी यांनी काहीही भाष्य केलेले नाही. राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह हे घटनात्मक पदावर असल्याने न्यायालयाने त्यांच्यावर खटला चालवण्यापासून दूर ठेवले आहे. उमा भारती यांना अयोध्येत न जाण्याचा सल्ला पंतप्रधान कार्यालयाने दिला आहे.
दोषींना शिक्षा झालीच पाहिजे : सूरजेवाला
बाबरी मशीद जमीनदोस्त झाली त्या प्रकरणातील दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी केली, ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य ‘नैतिकतेचा उच्च आदर्श’ राखतील आणि राजीनामा देतील, हे बघितले पाहिजे. त्यांचा रोख उमा भारती यांच्याकडे होता. दर्जा, जात, वंश, धर्म किंवा विभाग काहीही असला तरी कायदा हा सगळ््यांसाठी समान आहे, असे सूरजेवाला म्हणाले. पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिबल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाबद्दल समाधान व्यक्त केले व मोदी यांना त्यांच्याच नैतिकतेच्या घोषणांची आठवण असेल, अशी आशा आहे, असे म्हटले.
आरोपपत्र मागे
घ्या : खा. राऊ त
भाजप नेत्यांवर खटला चालवण्याचे आदेश कोर्टाने दिल्यानंतर शिवसेनेने केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. बाबरीप्रकरणी सरकारने आरोपपत्र मागे घ्यावे आणि मगच राम मंदिर बांधण्याची भाषा करावी, असे शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे. बाबरी मशीद पाडल्याशिवाय राम मंदिर होणे अशक्य होते. शिवसेना व
भाजपचा हाच अजेंडा होता. आताही केंदाचा्र तोच अजेंडा असला पाहिजे. बाबरी मशीद पाडणे हा कट मानला जातो आणि याप्रकरणात नेत्यांविरोधात खटला चालवला जातो हा प्रकार दुर्दैवी आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
प्राणार्पणासही तयार : उमा भारती
या निकालामुळे आपण अजिबात अस्वस्थ नसून, राम मंदिराच्यासाठी माझे आयुष्यही द्यायला तयार आहे, असे केंद्रीय मंत्री उमा भारती म्हणाल्या. रामजन्मभूमी मोहिमेमध्ये माझी जी भूमिका होती त्याबद्दल मला अभिमान वाटतो, पश्चाताप होत नाही. राम मंदिरासाठी केलेल्या संघर्षाबद्दल मिळेल, त्या शिक्षेला मी तोंड देईन. कट केल्याच्या आरोपांचा भारती यांनी इन्कार केला. कोणताही कट नव्हता. प्रत्येक गोष्ट उघड होती. मी राम मंदिर मोहिमेमध्ये अभिमान आणि आत्मविश्वासाने सहभागी होते. मी ६ डिसेंबर १९९२ रोजी मी मशिदीच्या ठिकाणी उपस्थित होते, असेही त्यांनी सांगितले.