15 ऑगस्टपूर्वी 200 रुपयांची नोट चलनात येणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2017 05:01 PM2017-07-27T17:01:20+5:302017-07-27T17:11:25+5:30
लवकरच तुमच्या खिशात 200 रूपयांची नवी नोट येणार आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये 500 आणि 2000 रूपयांची नोट जारी केल्यानंतर आता भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) 200 रूपयांची नोट जारी करण्याच्या तयारीत
नवी दिल्ली, दि. 27 - लवकरच तुमच्या खिशात 200 रूपयांची नवी नोट येणार आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये 500 आणि 2000 रूपयांची नोट जारी केल्यानंतर आता भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) 200 रूपयांची नोट जारी करण्याच्या तयारीत आहे. दोनशे रूपयांच्या नोटांची छपाई देखील सुरू झाली असल्याची सुत्रांची माहिती आहे. 200 रूपयांच्या नोटा जारी झाल्या तर गेल्यावर्षी जारी करण्यात आलेल्या 2000 रूपयांच्या नोटांनंतरचं हे दुसरं नवं चलन असेल.
गेल्या महिन्यात झालेल्या एका बैठकीत आरबीआयने 200 रूपयांची नोट बाजारात आणण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. सध्या चलनात असलेल्या नोटांएवढाच आकार 200 रुपयाच्या नोटांचा असेल. चलनात आल्यानंतर 200 रुपयांच्या नोटांची कमी भासू नये, यादृष्टीने मोठ्या प्रमाणात छपाई सुरू करण्यात आली असल्याचं समजतंय.
200 रूपयांची नोट कधी चलनात आणायची याबाबतही सरकारचा निर्णय झाला असल्याची सुत्रांची माहिती आहे. 15 ऑगस्टपूर्वी दोनशे रूपयांची नोट चलनात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोनशे रूपयांच्या नव्या नोटेची छपाई करताना सुरक्षेच्या दृष्टीने विशेष पावलं उचलण्यात आली आहेत. दोनशे रूपयांच्या नकली नोटा बाजारात येऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही समजतंय.
एटीएम मशिनमध्येही मिळणार दोनशे रूपयांची नोट-
दोनशे रूपयांची नोट एटीएम मशिनमध्ये उपलब्ध होणार नाही असं वृत्त काही दिवसांपूर्वी आलं होतं. पण नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार दोनशे रूपयांची नोट एटीएममध्ये उपलब्ध होणार आहे. 500 आणि 2 हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या त्यावेळी एटीएम मशिनमध्ये बदल करावे लागले. कारण या नोटांच्या आकारात बदल होता. मात्र सध्या चलनात असलेल्या नोटांएवढाच आकार 200 रुपयाच्या नोटांचा असणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे एटीएम मशिनमध्ये काहीही बदल करण्याची गरज भासणार नाही.
केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. त्यानंतर सरकारने लगेच दोन हजारांची नोट चलनात आणली. लगोलग पाचशे रुपयांची नवी नोटही आणण्यात आली. 200 रुपयांची नोट आणण्याबाबत मात्र कोणत्याही हालचाली झाल्या नव्हत्या; मात्र आता ही नोट आणण्यात येत आहे.