550 Rs. New Coin: लवकरच नवं चलन ! सरकारकडून 550 रुपयांचं नवीन नाणं होणार जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 10:38 PM2019-09-12T22:38:29+5:302019-09-12T22:39:34+5:30
550 Rs. New Currency: केंद्र सरकारला 550 रुपयांच्या नवीन नाण्याच्या डिझाईनसाठी संत शिरोमणी कमेटीने मंजुरी दिली आहे.
मुंबई - श्री गुरु नानक देव यांच्या 550 व्या प्रकाश पर्वाची देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. श्री गुरु नानक देव यांच्या या जंयती पर्वानिमित्त केंद्र सरकारकडून 550 रुपयांचे नवीन नाणं जारी करण्यात येणार आहे. या निर्णयाचे पंजाबमधील शीख समुदायाकडून कौतुक होत आहे. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे प्रमुख भाई गोविंदसिंग यांनी याबाबत माहिती दिली.
केंद्र सरकारला 550 रुपयांच्या नवीन नाण्याच्या डिझाईनसाठी संत शिरोमणी कमेटीने मंजुरी दिली आहे. श्री बेर साहेब सुल्तानपुर लोधी येथे 12 नोव्हेंबर रोजी श्री गुरु नानक यांच्या 550 व्या जयंती महोत्सव कार्यक्रमात केंद्र सरकार या नवीन नाण्याचं अनावरण करेल, असेही गोविंदसिंग यांनी सांगितले. या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनेक केंद्रीय मंत्री आणि पंजाब सरकारचे मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहे. तसेच, शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल आणि इतरही पंथ समदुयातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
केंद्र सरकारकडून नव्याने जारी होणाऱ्या या नाण्यावर प्रथम गुरुद्वार श्री बेर सुल्तानपूर लोधी यांचा फोटो एका बाजुला लावण्याचं शिरोमणी गुरुद्वार प्रबंधक कमिटीद्वारे सूचविण्यात आलं होतं. मात्र, केंद्र सरकारने या नाण्यावरील एका बाजुला गुरुनानक देवजी यांचे जन्मस्थान ननकाना साहिब गुरुद्वाराचा फोटो छापण्याचं ठरवलं आहे. 550 रुपयांचं हे नवीन नाणं बनविण्यासाठी 50 टक्के लोखंड आणि 40 टक्के तांब्याचा वापर करण्यात येणार आहे. तसेच, आकाराने हे नाणे 10 रुपयांच्या नाण्यापेक्षा मोठं असेल.